गणेशपुरीत सहा कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारीला सकाळी दोन पाळीव कुत्र्यांना उलट्या होऊन त्यांचा मृत्यू झाला.
गणेशपुरीत सहा कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

ठाणे : सहा कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ठाणे जिल्ह्याच्या गणेशपुरी भागात उघडकीस आला. या कुत्र्यांना विषबाधा झाली असावी, तसेच अज्ञात व्यक्तीने कुत्र्यांना विष घालून ठार मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारीला सकाळी दोन पाळीव कुत्र्यांना उलट्या होऊन त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आणखी तीन कुत्र्यांचाही अशाच प्रकारे संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी भिवंडी येथील रहिवासी मनीषा पाटील यांनी पोलिसांना सांगितले की, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या दोन पाळीव कुत्र्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरातील इतर तीन लोकांनीही अशाच एका घटनेची तक्रार पोलिसांकडे केली. काशिनाथ रावते, दिनेश जाधव आणि रवींद्र रावते यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या पाळीव कुत्र्यांचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे. याशिवाय गणेशपुरी परिसरात एका भटक्या कुत्र्याचाही उलट्या होऊन मृत्यू झाला.

याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मृत्यू झालेल्या सहा कुत्र्यांमध्ये दोन लॅब्राडॉर आणि एका जर्मन शेफर्ड कुत्र्याचा समावेश आहे. अज्ञात व्यक्तीने कुत्र्यांना विष घालून ठार मारल्याचा आम्हाला संशय आहे, असे ते म्हणाले.

या प्रकरणी पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in