स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण सात पटीने वाढले; १५ दिवसांत संसर्गग्रस्तांची संख्या १४१ पर्यंत

संसर्गजन्य आणि हवेत पसरणारा असल्याने गर्दीत जाणे टाळावे, मास्क वापरावा, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करावा म्हणजे या रोगापासून बचाव करणे सोपे जाईल
स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण सात पटीने वाढले; १५ दिवसांत संसर्गग्रस्तांची संख्या १४१ पर्यंत

रोना प्रमाणेच स्वाइन फ्ल्यू हा नियमित स्वरूपात आढळणारा एक श्वसन रोग आहे. हा रोग ए प्रकारच्या इफ्ल्युएन्झा व्हायरसमुळे होतो. स्वाइन फ्ल्यूचे विषाणू एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीकडे पसरल्याचे उदाहरणे आहेत, काही वर्षांपूर्वी हे स्थित्यंतर मर्यादित होते व बऱ्याचदा तीनपेक्षा जास्त लोकांपर्यंत हा रोग पसरत नव्हता मात्र आता हा रोग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे उघड होऊ लागले आहे.

ठाणे शहरात १५ दिवसांपूर्वी अवघे २० रुग्ण होते मात्र त्यानंतरच्या १५ दिवसात यात सात पटीने वाढ झाली असून आता ही रुग्ण संख्या १४१ वर पोहोचली आहे. संसर्गजन्य आणि हवेत पसरणारा असल्याने गर्दीत जाणे टाळावे, मास्क वापरावा, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करावा म्हणजे या रोगापासून बचाव करणे सोपे जाईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता स्वाइन फ्ल्यूची चिन्हे आणि लक्षणे नेहमीच्या मानवी फ्ल्यूसारखीच आहेत आणि त्यामध्ये खोकला, घसा बसणे किंवा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा जाणवत असते. काही लोकांना स्वाइन फ्ल्यू बरोबरच उलट्या आणि जुलाब झाल्याचे देखिल उघडकीस आले आहे. लोकांना स्वाइन फ्ल्यू बरोबरच न्युमोनिया आणि श्वसनसंस्था निकामी होणे असेही रोग होतात आणि त्यात काहींचा मृत्यू होतो. हंगामी फ्लूप्रमाणेच, स्वाइन फ्ल्यू देखील गंभीर रोगाचे स्वरूप घेऊ शकतो. प्रामुख्याने इंफ्लूएंझा झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्यातुन किंवा खोकण्यातुन फ्ल्यूचा विषाणू एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीकडे पसरतो. काही वेळा फ्ल्यूचा विषाणू असलेल्या एखाद्या वस्तूला हात लावून तोच हात नाक किंवा तोंडाला लावल्याने देखिल संसर्ग होतो असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ठाणे जिल्ह्यात सोमवारी रुग्णांची संख्या १२५ इतकी होती. परंतू, या संख्येत मागील चार दिवसात ८५ ने वाढ झाली असून सद्यस्थितीला जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या २१० इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत. ठाणे शहरात शुक्रवारी नवे ५१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या १४१ वर पोहोचली आहे. तर, ७० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शहरात शुक्रवारी आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा चार इतका झाला आहे. त्यापाठोपाठ, कल्याण-डोंबिवली ३५, नवी मुंबई २०, ठाणे ग्रामीण ६, मिरा भाईंदर ५, बदलापूर २ आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा सामावेश आहे. जिल्ह्यात सध्या ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित ९५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये चार रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत. तर, एक रुग्ण अंबरनाथ शहरातील आहे.

फ्ल्यूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना न्यूमोनिया, बॅक्टेरिअल न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस अशा प्रकारची गुंतागुंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मधुमेह, हृदयरोग अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.तज्ज्ञांच्या माहितीनुसार रुग्णांना श्वास घेण्यात अडथळा, छातीत खूप जास्त दुखत असेल, स्नायू दुखत असतील तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.

गर्भवती महिला, ५ वर्षांखालील लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाल्यास गुंतागुत निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.देशात आणि महाराष्ट्रात कोव्हिड-१९ पूर्णत: संपलेला नाही. कोरोना आणि स्वाईन फ्लूची लक्षणे एखसारखीच आहेत. पावसाळ्यामुळे फ्लूने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे आजारी लोकांची संख्याही वाढतेय. घरात एका व्यक्तीला आजार झाला की घरातील सर्वांना हा आजार होत असल्याचं दिसून आले आहे.

नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी

खोकला किंवा शिंक येत असल्यास नाका-तोंडावर रूमाल ठेवा, हात सतत धूत रहा ,डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्ष शक्यतो टाळा,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका , ताप, श्वास घेण्यास अडथळा होत असेल तर स्वत: औषध घेण्याचं टाळून वैद्यकीय सल्ला घ्या' असे जिल्हा जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ठाणे जिल्ह्यात पालिकेने याआधीच स्वाइन फ्ल्यूबाबत जनजागृती सुरू केली असून त्यावर उपाययोजनेला प्रारंभ देखिल करण्यात आला आहे.नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी स्वत:हून घेणे गरजेचे आहे. दरम्यान माणसांमध्ये आढळून येणाऱ्या 'फ्ल्यू' व्हायरस विरोधात लस उपलब्ध आहे. ही लस घेतल्यामुळे 'फ्ल्यू' पासून संरक्षण मिळू शकतं. लसीकरणामुळे एखादा व्यक्ती या विषाणूशी संपर्कात आला तरी, संसर्ग होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो. सहा महिन्यापुढील बाळापासून ते ५० वर्षांवरील व्यक्तीने फ्ल्यू विरोधातील लस घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. त्याचसोबत मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग, किडनीविकार, गर्भवती महिला आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांनी फ्ल्यूविरोधी लस घेतली पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in