सदनिकाधारकांच्या नशिबी टँकरचे पाणी; महिन्याकाठी हजारो रुपयांचा स्थानिकांना भुर्दंड

बदलापूर पूर्वेकडील यादव नगर परिसरात असलेल्या अमित पार्क सोसायटीतील सदनिकाधारकांना गेल्या काही वर्षांपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
सदनिकाधारकांच्या नशिबी टँकरचे पाणी; महिन्याकाठी हजारो रुपयांचा स्थानिकांना भुर्दंड

बदलापूर: झपाट्याने विस्तारत असेल्या बदलापूर शहरातील अनेक सदनिकाधारकांच्या नशिबी टँकरचे पाणी आले आहे. विशेष म्हणजे १५ वर्षांपासून जुन्या असलेल्या इमारतीत गेल्या काही महिन्यांपासून ही समस्या निर्माण झाली असून पाणी समस्या दूर करण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला यश आलेले नाही. त्यामुळे पाण्याच्या टँकरसाठी दर महिन्याला हजारो रुपयांचा भुर्दंड या सदनिकाधारकांच्या माथी पडला आहे.

बदलापूर पूर्वेकडील यादव नगर परिसरात असलेल्या अमित पार्क सोसायटीतील सदनिकाधारकांना गेल्या काही वर्षांपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. १५ वर्ष जुन्या असलेल्या अमित पार्क सोसायटी ७० सदनिकाधारक राहत आहेत. गेल्या चार वर्षांपासून आम्हाला पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यावेळी निदान अर्धा तास तरी पाणी येत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जेमतेम पाच ते दहा मिनिटेच पाणी येत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव पाण्यासाठी एक दिवस आड पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ येत असल्याचे खंत स्थानिकांनी व्यक्त केली. त्यातही टँकरचे पाणी गढूळ असल्याने ते इतर उपयोगासाठी वापरले जाते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी बाटल्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे सोसायटीतील सदनिकाधारकांनी म्हटले आहे.

नियमित कर, पाण्याची बिले भरूनही आमच्या नशिबी टँकरचे पाणी आले असून त्यासाठी दरमहा हजारो रुपयांच्या खर्चाचा भुर्दंडही माथी पडला असल्याची कैफियत सदनिकाधारक मांडत आहेत. आमची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण संपणार तरी केव्हा? असा या सदनिकाधारकांचा सवाल आहे.

प्रतीक्षा पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची

बदलापूर शहरातील पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजना टप्पा -२ ही योजना राबविण्यात येणार होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ही योजना राबवली गेली नाही. आता हीच योजना नगरोत्थान योजनेंतर्गत राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शहरात जलवाहिन्या व जलकुंभांची कामे करण्यात येणार असून त्यामुळे पाणी समस्येतून बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे ही योजना तरी लवकर मार्गी लावावी व पाणी समस्या दूर व्हावी, ही बदलापूरकरांची माफक अपेक्षा आहे.

प्रशासनाच्या त्रुटींमुळे शहरात पाणी समस्या

गेल्या काही दशकांपासून बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. वेगाने विस्तारणाऱ्या शहरात गृहसंकुलांचे जाळे विणले गेले असून अनेक गृहसंकुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे लोकसंख्येत आणखी भर पडणार आहे. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे शहराच्या अनेक भागात पाणी समस्या गंभीर होत चालली आहे. पाण्यासाठी अधूनमधून होणारी आंदोलने, मोर्चे ही समस्या अधोरेखित करीत आली आहेत. लोकप्रतिनिधी लवकरच पाणी समस्या दूर होईल, अशी आश्वासने देत आले आहेत. मात्र अद्याप तरी पाण्याची प्रतिक्षाच कायम आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी वर्ग अपुरा असतानाही शहरातील पाणी समस्या दूर करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. त्याचबरोबर आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून शासन दरबारी आम्ही, बदलापूर शहराची पाणी समस्या वेळोवेळी मांडलेली आहे व त्यानुसार, वेगवेगळ्या योजना, तसेच जलशुद्धीकरण केंद्र वाढवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून, लवकरच हे काम मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

- माधुरी पाटील, उपअभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बदलापूर उपविभाग

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in