Thane : शिक्षकांवर BLO कामाचा बोजा; ऐन परीक्षेच्या काळात शिक्षक त्रस्त

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) लवकरच राबविण्यात येणार असून, ठाणे जिल्ह्यात या मोहिमेची तयारी वेगाने सुरू झाली आहे.
Thane : शिक्षकांवर BLO कामाचा बोजा; ऐन परीक्षेच्या काळात शिक्षक त्रस्त
Thane : शिक्षकांवर BLO कामाचा बोजा; ऐन परीक्षेच्या काळात शिक्षक त्रस्तप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) लवकरच राबविण्यात येणार असून, ठाणे जिल्ह्यात या मोहिमेची तयारी वेगाने सुरू झाली आहे. मात्र, ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांवर बीएलओ (Booth Level Officer) कामाचा अतिरिक्त बोजा टाकण्यात आल्याने शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध टप्प्यांतील कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO सुपरवायझर) यांना पूर्णवेळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांश शिक्षकांचा समावेश असल्याने त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश जारी करत १० एप्रिल या कालावधीपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत मॅपिंग, टेबल-टॉप ॲक्टिव्हिटी, प्रोजेनी मॅपिंग, अनमॅप्ड मतदारांचे मॅपिंग, लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या समान नोंदींची पडताळणी (DSEs) तसेच अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्रांची तपासणी, अशी महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.

कारवाईची टांगती तलवार

ज्या शिक्षकांची परीक्षा कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी संबंधित दिवशी परीक्षा पूर्ण करून त्यानंतरच्या दिवशी मतदार यादीचे काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. बीएलओ आणि पर्यवेक्षकांनी ७ एप्रिल व ११ एप्रिल रोजी अहवाल सादर करणे बंधनकारक असून, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी ८ एप्रिल व १३ एप्रिल रोजी एकत्रित अहवाल उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे. या कामात कोणतीही अनियमितता आढळल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० अंतर्गत कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

शिक्षकांवर अतिरिक्त भार

दरम्यान, १० वी व १२ वीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या असून शाळांमध्ये सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा कामाचा ताण असतानाच मतदार यादीच्या कामाचा अतिरिक्त भार शिक्षकांवर पडत आहे. घर, शाळा आणि निवडणूक कामे या तिहेरी जबाबदाऱ्यांमुळे शिक्षक त्रस्त झाले असून, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in