भिवंडीत उड्डाणपुलावर टेम्पोची धडक

बॅरिकेडिंगमुळे शहरात दररोज अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याला आळा घालण्यात प्रशासन पूर्णपणे उदासीन आहे
भिवंडीत उड्डाणपुलावर टेम्पोची धडक

भिवंडी : शहराच्या मध्यभागी असलेल्या राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या वाहनांना प्रवेश रोखण्यासाठी लावण्यात आलेले उंचीचे बॅरिकेडिंग जनतेसाठी त्रासाचे ठरले आहे. रविवारी सायंकाळी भरधाव वेगात असलेल्या टेम्पोची बॅरिकेडिंगला जोरदार धडक बसल्याने बॅरिकेडिंग कोसळून एका कारवर पडल्याने कारचे नुकसान झाले आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. महापालिका प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी कल्याण रोडवरील कोनगाव येथील रहिवासी असलेले कुटुंब स्विफ्ट कारने शेलार गावाकडे जात असताना राजीव गांधी उड्डाणपुलावरून गाडी जात असताना ती पुलावरून खाली उतरू लागली. दरम्यान, वंजारपट्टीकडून भरधाव वेगात येणारा टेम्पो उड्डाणपुलावर चढण्याच्या प्रयत्नात असताना बॅरिकेडिंगचा अंदाज न आल्यामुळे उंच बॅरिकेडिंगला धडकला. त्यामुळे बॅरिकेडिंग तुटून कारसह दुचाकीस्वारावर पडला. त्यामुळे कारस्वार थोडक्यात बचावला; मात्र कारचे नुकसान झाले. तर या अपघातात दुचाकीस्वाराचा हात तुटला.

त्यानंतर त्याला इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र तेथे एक्स-रे मशीन बंद असल्याने दुचाकीस्वारास उपचारासाठी खूप त्रास सहन करावा लागला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीने उड्डाण पुलावरील बॅरिकेडिंग हटवून दुरुस्तीसाठी पाठवून पूल वाहतुकीसाठी मोकळाही केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या तक्रारीवरून निजामपूर पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच अपघाताला जबाबदार धरून गुन्हा दाखल केला आहे.

बॅरिकेडिंगमुळे अपघात

बॅरिकेडिंगमुळे शहरात दररोज अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याला आळा घालण्यात प्रशासन पूर्णपणे उदासीन आहे. एवढेच नाही, तर नुकताच राजीव गांधी उड्डाणपूल कोसळल्याने त्याची दुरवस्था झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्याच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले, असे असतानाही हा पूल कमकुवत असल्याने त्यावरून मोठ्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मोठमोठी वाहने पुलावर येऊ नयेत, यासाठी महापालिकेने पुलाच्या तिन्ही बाजूंनी आठ फूट उंच लोखंडी बॅरिकेड्स लावले आहेत. परंतु सुरक्षेची कोणतीही चिन्हे नसल्यामुळे दररोज अपघात होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in