Badlapur school sexual abuse: वामन म्हात्रेंना तूर्तास दिलासा, बदलापूर महिला पत्रकार विनयभंग प्रकरण

बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचारानंतर उसळलेल्या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार महिलेचा अर्वाच्य व अश्लाघ्य भाषेत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला.
Badlapur school sexual abuse: वामन म्हात्रेंना तूर्तास दिलासा, बदलापूर महिला पत्रकार विनयभंग प्रकरण
Waman Mhatre/FB
Published on

मुंबई : बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचारानंतर उसळलेल्या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार महिलेचा अर्वाच्य व अश्लाघ्य भाषेत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला.

न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकल पीठाने म्हात्रे यांना कनिष्ठ न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असल्याने आणि पोलिसांनी तूर्तास अटक करणार नसल्याची हमी दिल्याने याचिका निकाली काढली. तसेच कानिष्ठ न्यायालयाच्या निर्णयानंतर गरज भासल्यास म्हात्रे यांनी हायकोर्टाच्या रजिस्ट्रीकडे याचिका दाखल करावी, असे स्पष्ट केले.

बदलापुरातील आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दै. ‘सकाळ’च्या स्थानिक महिला पत्रकाराला शिंदे गटाच्या वामन म्हात्रे यांनी, ‘तू अशा बातम्या करतेस, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ असे अपमानास्पद आणि अर्वाच्य शब्द वापरले. याप्रकरणी महिला पत्रकाराने तक्रार दाखल केल्यानंतर ३६ तासांनी पोलिसांनी वामन म्हात्रे यांच्याविरुद्ध विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वाढल्याने म्हात्रे यांनी अ‍ॅड. विरेश पुरवंत व अ‍ॅड. ऋषिकेश काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकल पीठासमोर सुनावणी झाली. म्हात्रे यांनी कल्याण कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर २९ ऑगस्टला सुनावणी निश्चित करण्यात आली असल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तर म्हात्रे यांच्यावतीने अ‍ॅड. विरेश पुरवंत यांनी कनिष्ठ न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले नसल्याने न्यायालयाने संरक्षण द्यावे, अशी विनंती केली. यावेळी पोलिसांच्यावतीने म्हात्रे यांना २९ ऑगस्टपर्यंत अटक केली जाणार नाही, अशी हमी देण्यात आली. याची दखल घेत न्यायालयाने याचिका निकाली काढली.

logo
marathi.freepressjournal.in