उल्हासनगरात भाजप-शिंदे गटात टेंडर वॉर? टेंडर प्रक्रियेवरून आमनेसामने; भाजपतर्फे १५ दिवसांचा अल्टिमेट

भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी ठेकेदार प्रेम झा यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत,
उल्हासनगरात भाजप-शिंदे गटात टेंडर वॉर? टेंडर प्रक्रियेवरून आमनेसामने; भाजपतर्फे १५ दिवसांचा अल्टिमेट

उल्हासनगर : गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेतील कंत्राटदार झा.पी याची कंपनी खोटी कागदपत्रे सादर करून कोट्यवधीचे कंत्राट घेत आहेत, यात महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी व माजी महापौर लीलाबाई आशान यांचा पुत्र अरुण आशान सामील असल्याचा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दुसरीकडे अरुण आशान यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले असून प्रदीप रामचंदानी यांनी केलेले आरोप म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून झा.पी कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे तसेच या कंपनीविरोधात १५ दिवसांच्या आत फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी भाजपची मागणी असून जर ही कारवाई झाली नाही तर पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे.

उल्हासनगरातील भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असून शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतले समजले जातात, उल्हासनगर शहरातील विकासकामाच्या टेंडर प्रक्रियेवरून हे दोन्ही पक्ष आमनेसामने आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. उल्हासनगर येथील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदीप रामचंदानी यांनी हा आरोप केला आहे, यावेळी भाजप आमदार कुमार आयलानी, माजी महापौर मीना आयलानी, माजी नगरसेवक राजेश वधारिया, शेरी लुंड, डॉ. प्रकाश नाथानी, किशोर वनवारी व अन्य उपस्थित होते. झा.पी ही कंपनी नियमबाह्य पद्धतीने काम करीत आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी ठेकेदार प्रेम झा यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, यावर प्रतिक्रिया देताना प्रेम झा यांनी सांगितले की, प्रदीप रामचंदानी हे स्वतः माझ्या व्यवसायात २० टक्के पार्टनर आहेत, आमचा वाद हा एका टेंडर प्रक्रियेवरून असून रामचंदानी यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले.

प्रदीप रामचंदानी यांनी आपल्यावर केलेले आरोप हे खोटे असून, त्यांचे आरोप म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. यावेळी अरुण आशान यांनी देखील रामचंदानी यांची कंपनी आयुक्तांनी काळ्या यादीत टाकली असल्याचे पत्र माध्यमासमोर दाखवले, तसेच रामचंदानी त्यांनी देखील महापालिकेत मोठा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे सादर केले.

-अरुण आशान, उपजिल्हाप्रमुख शिंदे गट

logo
marathi.freepressjournal.in