शिवसेना-भाजपमध्ये तणाव; रस्त्यांच्या तसेच शहाड ब्रिजच्या समस्यांमुळे वाद

शिवसेना-भाजपमध्ये तणाव; रस्त्यांच्या तसेच शहाड ब्रिजच्या समस्यांमुळे वाद

उल्हासनगरातील शहाड ब्रिजला भगदाड पडल्याने आणि शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांच्या समस्येमुळे उल्हासनगरच्या शिवसेनाविरुद्ध भाजप युतीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरातील शहाड ब्रिजला भगदाड पडल्याने आणि शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांच्या समस्येमुळे उल्हासनगरच्या शिवसेनाविरुद्ध भाजप युतीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे युवासेना कल्याण लोकसभा सचिव विक्की भुल्लर यांनी आमदार कुमार आयलानी यांच्यावर टीका करत शहरात बॅनर लावले आहेत. या बॅनर्सद्वारे त्यांनी आमदारांच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

विक्की भुल्लर यांनी स्पष्ट केले की, ते युतीविरोधात नाहीत, परंतु शहराच्या विकासासाठी त्यांनी हा बॅनर लावला आहे. त्यांनी असेही सांगितले की, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार असून भाजपचे तिकीट कापून शिवसेना शिंदे गटाला देण्यात येणार आहे. शहाड ब्रिजवरील भगदाडामुळे आणि शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. विक्की भुल्लर यांच्या बॅनर्समुळे उल्हासनगर शहरात राजकीय वातावरण तापले आहे. शहरातील नागरिकांनी देखील या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

भाजप आमदार कुमार आयलानी यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील विकासकामे आणि रस्त्यांची देखभाल यावरून स्थानिक राजकारण तापले आहे.

कल्याणमधील ठाकरे गटाच्या बॅनरची चर्चा

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबविली. या योजनेला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने ही योजना अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. कल्याणमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी लाडकी नागरिकांना त्रस्त करणाऱ्या योजना असा उल्लेख करत कल्याण पश्चिम व स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा, माझा लाडका कचऱ्याचा ढीग, माझा लाडका रस्त्यावर तुंबलेले पाणी, माझा लाडका घरात शिरलेले गटाराचे पाणी या सारख्या योजना शासनाकडून नागरिकांना मोफत देत नागरिकाना भंडावून सोडण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या चित्राच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या बॅनरची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in