

भिवंडी : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील फरार आरोपी प्रकाश मिसाळ (रा. बीड) आणि अशोककुमार बाबूलाल शाव (रा. दिल्ली) यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली आहे. दोन्ही आरोपींना २० सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
बुधवारी दोन्ही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तपासी अधिकाऱ्यांनी आरोपींकडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांची यादी मिळाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या यादीतील माहितीची पडताळणी करणे तसेच प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे सांगत तपासी अधिकाऱ्यांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली.
टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींकडून मिळालेल्या कागदपत्रे व विद्यार्थ्यांच्या यादीच्या आधारे पोलिसांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी ३,५०० पानांचे दोषारोपपत्र भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केले आहे. पुढील तपासात या प्रकरणातील इतर संबंधितांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.