Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

टीईटी पेपरफुटी प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे.
Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक
Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक
Published on

भिवंडीः टीईटी पेपरफुटी प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. या आरोपींना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या दोन आरोपींच्या अटकेनंतर टीईटी प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या १८ वर पोहोचली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयात दोषारोपपत्र देखील सादर केले आहे. प्रकाश मिसाळ (रा.बीड) व अशोककुमार बाबूलाल शाव (रा.बिहार) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. प्रकाश मिसाळ यास बीड येथून तर अशोक कुमार शाव यास बिहार येथून पोलिसांनी अटक केली आहे.

टीईटी पेपर फुटी प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी कपिल दहिया हा प्रकाश मिसाळ याला पुणे येथे भेटण्यासाठी आला होता. एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली होती. त्यावेळी टीईटी परीक्षेच्या पेपर संदर्भातील खरेदी विक्रीबद्दल या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

दुसरा आरोपी अशोककुमार शाव याच्या बिहार येथील राहत्या घरातून तपास पथकाने १४९ लोकांच्या नावाची यादी पोलीसांनी जप्त केली आहे. या यादीत टीईटी परीक्षेला बसलेल्या १८ परिक्षार्थींची नावे असल्याचे तपासात समोर आले आहे.

त्यामुळे या यादीतील व्यक्तींशी आरोपींनी काही आर्थिक व्यवहार केले आहेत का यासंदर्भात पोलीस तपास सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. पोलीस तपासात आणखी काही महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे, असे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त विजय मराठे यांनी सांगितले.

या दोघांच्या अटकेमुळे आग्रा येथील छापखान्यात छापण्यात आलेल्या गोपनीय प्रश्नपत्रिका ते महाराष्ट्रात त्यांचे कथित वितरण आणि विक्रीचा प्रयत्न या संपूर्ण साखळीबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in