Thane : ‘भ्रष्ट कारभार, सत्ताधारी महाराष्ट्रावर भार’; सरकारविरोधात ठाकरे गटाचे ‘जनआक्रोश आंदोलन’

महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई आदी उपनगरांमध्येही शिवसैनिकांनी रस्त्यांवर उतरून भ्रष्टचारी मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारविरोधात निदर्शने केली.
Thane : ‘भ्रष्ट कारभार, सत्ताधारी महाराष्ट्रावर भार’; सरकारविरोधात ठाकरे गटाचे ‘जनआक्रोश आंदोलन’
छायाचित्र : राजेश वराडकर
Published on

ठाणे : महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई आदी उपनगरांमध्येही शिवसैनिकांनी रस्त्यांवर उतरून भ्रष्टचारी मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारविरोधात निदर्शने केली. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना नेते खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी आंदोलनात भाग घेतला. महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी अख्खा परिसर दणाणून सोडला. पैशाची बॅग, टावेल व बनियान परिधान करून तसेच बाक्सिंग ग्लोव्ह‌ज घालून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारमधील मंत्री व आमदारांविरुद्ध घोषणा दिल्या.

छायाचित्र : राजेश वराडकर

डोंबिवलीत बॉक्सिंग व पत्त्यांचे खेळ दाखवत सरकारवर टीका

डोंबिवली : राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांनी महाराष्ट्र देशभरात बदनाम होत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे सोमवार डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

शिवसैनिकांनी घरात बॅग पैशाची सत्ता पन्नास खोक्याची, महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा, काळे धंदे भ्रष्ट कारभार, सत्ताधारी महाराष्ट्रावर भार असे बॅनर घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सत्तेतील आमदारांविरुद्ध घोषणाबाजी केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, अभिजित सावंत, तात्या माने, वैशाली दरेकर, उपशहर प्रमुख शाम चौगले, विलास म्हात्रे, चेतन म्हात्रे, शहर सचिव सुरेश परदेशी, विभाग प्रमुख राजेंद्र सावंत, नितीन पवार, अनिल मुथा, शेखर चव्हाण, युवा विधानसभा आदित्य पाटील, कुणाल ढापरे, शिबू शेख, संदेश कदम, प्रिय दांडगे, नवले राकेश मोहिते, भारतीय नाचरे, साक्षी भांडे, अनिता जंगले, ममता सायगावकर, संदीप उबाळे आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवसैनिकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे सरकार दरबारी बॉक्सिंग फायटिंग आणि रमीचा डाव याचे व्यंगात्मक प्रात्यक्षिक दाखवले.

छायाचित्र : राजेश वराडकर

भ्रष्ट मंत्र्यांवर साधला निशाणा

यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले, राज्य सरकारमधील समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा ६० कोटींचा घोटाळा आणि १५०० कोटींचा गैरव्यवहार, कृषीमंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचे रमीचे डाव, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेला डान्स बार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनी ट्रॅप प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर सरकारवर टीका केली.

छायाचित्र : राजेश वराडकर

रमी खेळणाऱ्यांना पदावरून हटवा; उल्हासनगरच्या रस्त्यांवर संतापाचा उद्रेक

उल्हासनगर : महाराष्ट्रभर पेटलेल्या असंतोषाच्या लाटेला उल्हासनगरातही सोमवारी उधाण आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भ्रष्टाचार, नाकर्तेपणा आणि गैरवर्तन करणाऱ्या मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी ‘जनआक्रोश आंदोलन’ केले. महायुती सरकारमधील कलंकित नेत्यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी करत कॅम्प ५ मधील कैलाश कॉलनी परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक रस्त्यावर उतरले. ‘भ्रष्टाचाऱ्यांचा नाश होवो’, ‘नाकर्त्या सरकारचा निषेध असो’, ‘जनतेचा आक्रोश थांबणार नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान नेत्यांनी महायुती सरकारमधील गंभीर आरोपांना सामोरे जाणारे, विधानभवनात रम्मी खेळून जनतेच्या विश्वासाचा अपमान करणारे आणि आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या मंत्र्यांचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरून हटवण्याची मागणी केली. आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी हा केवळ राजकीय लढा नसून जनतेच्या सन्मानाचा, प्रामाणिक प्रशासनाचा आणि लोकशाहीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले.

छायाचित्र : राजेश वराडकर

धनंजय बोडारे यांनी यावेळी भाषण करताना सरकारच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढले आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. “भ्रष्टाचार करणाऱ्यांना मंत्रिपदावर बसवणारे सरकार जनतेच्या मनात स्थान मिळवू शकत नाही. ही लढाई जनतेची आहे आणि ती विजय मिळवूनच थांबणार,” असे बोडारे म्हणाले. या जनआक्रोश आंदोलनामुळे उल्हासनगरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, नागरिकांच्या आक्रोशाचा आवाज राज्यभर पोहोचवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न निश्चितच यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भिवंडीत ‘जोडे मारा’ आंदोलन

भिवंडी : महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या युती सरकारमधील संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन या भ्रष्ट मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाठीशी घालत वाचवत आहेत. या भ्रष्ट मंत्र्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भ्रष्ट मंत्र्यांच्या बॅनरला जोडे मारून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. भिवंडीत पक्षाचे उपनेते विश्वास थळे, ज्योती ठाकरे, सह संपर्क प्रमुख सोन्या पाटील, यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

छायाचित्र : राजेश वराडकर

घोषणांनी परिसर दणाणला

यावेळी महिला शिवसैनिकांनी बारच्या सावलीत बसले कोण? काळ्या धंद्याचे पुढारी दोन, काखेत रुमाल, चेहरा भोळा, बुवाबाजी मंत्र्यांना करू ओम फट स्वाहा, बाजार उठलाय घोटाळ्यांचा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

logo
marathi.freepressjournal.in