ठाणेकरांवर पाणी कपातीसह शटडाऊनहीचे संकट

ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे आधीच निर्माण झालेल्या पाणीटंचाईत आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
ठाणेकरांवर पाणी कपातीसह शटडाऊनहीचे संकट
ठाणेकरांवर पाणी कपातीसह शटडाऊनहीचे संकटप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

ठाणे: ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे आधीच निर्माण झालेल्या पाणीटंचाईत आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणीकपात करण्याचे नियोजन सुरू असतानाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), स्टेम आणि मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच एमआयडीसीच्या प्रस्तावित शटडाऊनमुळे नागरिकांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून २५० दशलक्ष लिटर, एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर, स्टेमकडून ११५ दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेक डून ८५ दशलक्ष लिटर पाणी मिळते. घोडबंदर परिसरासाठी मुंबई महापालिकेकडे ५० दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात पाच दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्याने या भागाचा पुरवठा ११५ वरून १२० दशलक्ष लिटर झाला आहे.

तूट १०६ दशलक्ष लिटरपर्यंत जाण्याची भीती

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २७ लाख असून, शहराला दररोज ६२१ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ५८५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत असल्याने मागणी आणि पुरवठ्यात तफावत आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही तूट वाढून दररोज ४७ दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचली आहे. प्रस्तावित १० टक्के कपात लागू झाल्यास आणखी सुमारे ५९ दशलक्ष लिटर पाण्याची घट होऊ शकते. त्यामुळे एकूण तूट १०६ दशलक्ष लिटरपर्यंत जाण्याची भीती आहे.

समतोल पाणीवितरणाचे मोठे आव्हान

अल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. पाणीगळती रोखणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत असून, महापालिकेसमोर समतोल पाणीवितरणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in