

ठाणे : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूर आणि भूस्खलनामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील, विशेषतः ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. रसुवा, तिमुरे आणि भोटेकोशी परिसरात पुरामुळे रस्ते, पूल तसेच दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाल्याने काही यात्रेकरूंचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ठाण्यातील रेखा सतीश पाटणकर, सतीश विनायक पाटणकर, अपर्णा समीर जोशी आणि समीर मुकुंद जोशी हे २६ ऑगस्टच्या सकाळी भारत-चीन सीमाभागात असताना महापूर आल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे माहिती दिली आहे. याचप्रमाणे कल्याण पश्चिम येथील संजय राजमल पाटील आणि नलिनी संजय पाटील हे काठमांडूहून तिमुरे आणि केरुंगमार्गे कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघाले होते. भोटेकोशी परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे नातेवाईकांनी प्रशासनाला कळविले आहे.
तसेच ठाणे येथील राजाराम रघुनाथ नातू, नवी मुंबई येथील यश भंडी, कल्याण येथील अभिषेक घाणे आणि डोंबिवली येथील प्रकाश शांताराम माणे व प्रतीक्षा प्रकाश माणे यांच्याबाबतही संपर्क तुटल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. या नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, संबंधित प्रवास संस्था तसेच भारतीय यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील १२ नागरिकांच्या संपर्काबाबत प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यापैकी काही नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उर्वरित नागरिकांच्यानातेवाईकांशी जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात असल्याची माहिती मनोज शिवाजी सानप, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे.
'सहाय्यता' पोर्टलवर माहिती नोंदवावी
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून नेपाळमधील संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्यात येत आहे. राज्य शासन, भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'सहाय्यता' इमर्जन्सी इव्हॅक्युएशन रजिस्ट्रेशन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.
नातेवाईकांना संयमाचे आवाहन
पूरग्रस्त भागातील रस्ते आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे संपर्क होण्यास विलंब होऊ शकतो. प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. आपत्कालीन संपर्क जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे - टोल फ्री १०७७, दूरध्वनी ९३७२३ ३८८२७ / ०२२-२५३०१७४०.