Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

स्वस्त दरात घर देण्याचे आमिष आणि शेअर ट्रेडिंगमध्ये तब्बल १२ टक्के मासिक व्याज मिळवून देण्याचे आश्वासन देत ६४ वर्षीय निवृत्त व्यक्तीसह त्यांच्या नातेवाईक व परिचितांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार
Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाणे : स्वस्त दरात घर देण्याचे आमिष आणि शेअर ट्रेडिंगमध्ये तब्बल १२ टक्के मासिक व्याज मिळवून देण्याचे आश्वासन देत ६४ वर्षीय निवृत्त व्यक्तीसह त्यांच्या नातेवाईक व परिचितांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अविनाश दगडू गायकवाड, कविता अविनाश गायकवाड आणि स्वराज छिंदलाल मलिक या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

कोलशेत येथे राहणारे तक्रारदार दिलीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये मानकोली येथील ‘स्मार्ट इस्टेट होम’ प्रकल्पाच्या जाहिरातीने प्रभावित होऊन त्यांनी कुटुंबीयांच्या नावावर आठ सदनिका आरक्षित केल्या. त्यासाठी ३५ लाख २२ हजार ५९० रुपये भरले. मात्र, प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

दरम्यान, आरोपींनी शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा १२ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिल्याने पाटील व कुटुंबीयांनी तब्बल १ कोटी ८९ लाख रुपये गुंतवले. सुरुवातीला ९० लाख ६२ हजार रुपये परतावा दिल्यानंतर पैसे देणे बंद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

स्वतःची व नातेवाईकांची मिळून २ कोटी २४ लाख २२ हजार ५९० रुपयांची, तर परिचितांची १ कोटी ७९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in