ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! उद्यापासून खुले होणार 'ग्रँड सेंट्रल पार्क', बघा खासियत काय?

हे सेंट्रल पार्क ठाणे महापालिकेच्या मालकीचे असूनही आतापर्यंत हे पार्क विकासकाच्या ताब्यात होते. सर्वसामान्य नागरिकांना या पार्कमध्ये प्रवेश देण्यात येत नव्हता; मात्र आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर...
ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! उद्यापासून खुले होणार 'ग्रँड सेंट्रल पार्क', बघा खासियत काय?

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या बदल्यात ढोकाळी येथील २० एकरचा भूखंडावर अखेर सात वर्षांनंतर ठाणेकरांना सेंट्रल पार्क उपलब्ध होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते, तर आता उद्या ८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सेंट्रल पार्कचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हे सेंट्रल पार्क ठाणे महापालिकेच्या मालकीचे असूनही आतापर्यंत हे पार्क विकासकाच्या ताब्यात होते. सर्वसामान्य नागरिकांना या पार्कमध्ये प्रवेश देण्यात येत नव्हता; मात्र आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर या पार्कचे लोकार्पण करून ठाणेकर नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. न्यूयार्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हाईड पार्क आणि शिकागोच्या लिन्कॉलीन उद्यानाच्या संकल्पनेवर आधारीत सेंट्रल पार्कची उभारणी करण्यात आलेली आहे. 

तब्बल २० एकरमध्ये पसरलेल्या या पार्कमध्ये जॉगिंग, सायकलिंग यांच्यासह जंगलातून फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील या पार्कच्या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु ठाणेकरांना ते केव्हा उपलब्ध होणार? असा सवाल वांरवार केला जात होता. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेनेच्या वचननाम्यात देखील या पार्कचा उल्लेख करण्यात आला होता. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून ढोकाळी भागात २० एकरवर सेंट्रल पार्क उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. या संदर्भातील प्रस्तावही २०१७ मध्ये झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला होता. यातून ठाणेकरांना बाहेर कुठेही न जाता येथेच पर्यटनाचा आनंद मिळावा हा चांगला हेतू यामागे होता. त्यानुसार या पार्कचे काम कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या बदल्यात विकसित करण्यासाठी एका विकासकाला देण्यात आले होते. परंतु सात वर्षे उलटूनही या पार्कचे काम पूर्ण न झाल्याने टीका देखील झाली. आता ठाणेकरांना पर्यटनासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज पडणार नसून ढोकाळी भागात तब्बल २० एकरावरील सेंट्रल पार्क आता ठाण्याची शोभा वाढविण्यासाठी सज्ज झाले आहे.

असे आहे सेंट्रल पार्क

  • चार विभागात हे पार्क विकसित करण्यात आले आहे.

  • पहिल्या विभाग लहान मुलांसाठी - पहिल्या विभागात लहान मुलांसाठी खेळणी, विविध गेम, फाऊंटन असे आहे, ज्याठिकाणी मुलांना नाचत-बागडत भिजण्याचा आनंद घेता येणार आहे.

  • दुसरा विभाग - प्लेअरेनी - या विभागात लॉन टेनिस, मल्टीपल कोर्ट, बास्केट बॉल, व्हॉलीबालसह इतर विविध खेळ खेळात येणार आहेत.

  • तिसरा विभाग - स्केट पार्क - या ठिकाणी स्टेटींगसह विविध ॲडव्हेंचर गेम खेळता येणार आहेत.

  • चाैथा विभाग - रॉक फ्लायमिंग वॉल - याठिकाणी गार्डन, एक वेगळे प्रकारचे ट्री हाऊस तयार करण्यात आले आहे. तसेच अर्बन जंगल देखील उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी फिरताना जंगलात फिरण्याचा आनंद घेता येणार आहे.

  • याशिवाय, काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. 

  • तसेच वॉक वे देखील असणार असून, याठिकाणी चालताना वेलींच्या आतून जाण्यास मिळणार आहे.

  • याशिवाय तलावाजवळ रेस्टॉरंट आणि कॅफे देखील उपलब्ध असणार आहे.

  • तसेच तळ अधिक एक मजल्याची पार्किंगची सुविधा देखील नागरिकांना उपलब्ध असणार आहे.

  • सायकल पार्किंगसाठी जागा तर उपलब्ध असणार आहेच, परंतु ज्यांना सायकलिंग करायचे असेल किंवा चालायचे असेल त्यांच्यासाठी देखील सुविधा उपलब्ध असणार आहे.

माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, तर विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ठाण्यात तब्बल २० एकरमध्ये पसरलेल्या या सेंट्रल पार्कच्या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१७ साली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते; मात्र आता या सेंट्रल पार्कचे काम पूर्ण झाले असून या पार्कचे लोकार्पण आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाच्या वतीनेच ठाण्यातील विविध विकासकांमाच्या उद‌्घाटनाचा धडाका लावण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in