Thane : ३२ मीटर शिडीच्या देखभालीवर ५.८५ कोटींचा खर्च; तीन वर्षांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, नव्या निविदेपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ

उंच इमारतींना आग लागल्यास अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ठाणे महापालिकेच्या ३२ मीटर उंच शिडीच्या वाहनाच्या देखभाल-दुरुस्तीवर पुढील तीन वर्षांत तब्बल ५ कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
Thane : ३२ मीटर शिडीच्या देखभालीवर ५.८५ कोटींचा खर्च; तीन वर्षांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, नव्या निविदेपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ
Thane : ३२ मीटर शिडीच्या देखभालीवर ५.८५ कोटींचा खर्च; तीन वर्षांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, नव्या निविदेपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

ठाणे : उंच इमारतींना आग लागल्यास अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ठाणे महापालिकेच्या ३२ मीटर उंच शिडीच्या वाहनाच्या देखभाल-दुरुस्तीवर पुढील तीन वर्षांत तब्बल ५ कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. विशेष म्हणजे, नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्याच्या कंत्राटदाराला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचेही प्रस्तावित आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे.

ठाण्यातील रहेजा परिसरातील उंच इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अग्निसुरक्षा आणि बचाव यंत्रणेच्या सज्जतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटनांमध्ये उंच मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी शिडीच्या वाहनाची भूमिका महत्त्वाची असते.

महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे एमएच ०४ ईपी ००२८ क्रमांकाचे ३२ मीटर उंचीपर्यंत पोहोचणारे शिडीचे वाहन आहे. २०१२ मध्ये ताफ्यात दाखल झालेले हे वाहन ऑस्ट्रियातील रोझनबॉअर इंटरनॅशनल कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. वाहनाचे सुटे भाग परदेशातून मागवावे लागत असल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीला विलंब होतो. त्यामुळे नियमित देखभाल आणि सुट्या भागांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तीन वर्षांची नवीन निविदा काढण्यात येणार आहे.

या कामासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात २ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद असली, तरी मागील दायित्व आणि मंजूर निविदेच्या खर्चामुळे सुमारे ३ कोटी १८ लाख रुपयांचा आर्थिक भार निर्माण झाला आहे. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक दायित्व स्वीकारण्यासाठी महासभेची मंजुरी मागण्यात आली आहे. या प्रस्तावावर महासभेत काय निर्णय होतो? याकडे आता लक्ष लागले आहे.

३८ लाख ९ हजार १६ रुपये अतिरिक्त खर्च

या देखभालीसाठी पहिल्या वर्षी १ कोटी ७८ लाख ७९ हजार, दुसऱ्या वर्षी १ कोटी ९४ लाख ६७ हजार आणि तिसऱ्या वर्षी २ कोटी ११ लाख ९९ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. परदेशातून सुटे भाग मागविण्याचा खर्च आणि युरोच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार लक्षात घेऊन दरवर्षी १० टक्के खर्चवाढ गृहीत धरण्यात आली आहे. दरम्यान, मागील निविदा २३ ऑगस्ट २०२६ रोजी संपुष्टात आल्याने नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जुन्या कंत्राटदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी ३८ लाख ९ हजार १६ रुपये अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)