

ठाणे शहरातील मुख्य जलवाहिनी पुन्हा नादुरुस्त झाल्याने पुढील चार दिवस ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे, शहापूर तालुक्यातील नारळवाडी व पारधवाडी आदिवासी वस्त्यांमध्ये डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईची गंभीर समस्या जाणवू लागली असून ग्रामपंचायतींनी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.
ठाण्यात चार दिवस ५० टक्के पाणीकपात
ठाणे : ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यावरून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून नेणारी १००० मि.मी. व्यासाची जलवाहिनी गुरुवार, दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी पुन्हा एकदा कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या कामादरम्यान नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने ठाण्यात ३० टक्के पाणीकपातीला ठाणेकरांना सामोरे जावे लागत असतानाच ५० टक्के पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
सदर जलवाहिनी जुनी असून प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्याने दुरुस्तीसाठी आणखी चार दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. या दुरुस्तीमुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून ठाणे शहरात तत्काळ ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, अनावश्यक वापर टाळावा आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
झोनिंग पद्धतीने १२ तासच पाणीपुरवठा
ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच सुरू असलेली विविध विकासकामांमुळे कुठेना कुठे पाण्याच्या वाहिनीला फटका बसतो आणि त्याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागतो. शहरातील पाणी वितरणाचा समतोल राखण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत संपूर्ण ठाणे शहरात झोनिंग पद्धतीने दिवसातून १२ तासच पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी कमी प्रमाणात व अनियमित वेळेत मिळण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमध्येच पाणीटंचाईला सुरुवात
शहापूर : शहापूर तालुक्यातील कसारा घाटाच्या खाली असलेल्या नारळवाडी आणि पारधवाडी या आदिवासी वस्त्यांमध्ये डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या भागातील ग्रामपंचायतींनी परिस्थितीची दाहकता लक्षात घेऊन टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शहापूर तालुक्यातील दुर्गम वाड्यांमध्ये डिसेंबर अखेर पाणीटंचाई जाणवू लागते, मात्र चालू वर्षी तिची सुरुवात अधिक लवकर झाली आहे.कसारा घाटाखालील नारळवाडी, पारधवाडी आणि आसपासच्या आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा तीव्र झाला असून नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
पाणीटंचाई हाताळण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी शहापूर पंचायत समिती पाणीपुरवठा उपविभागाला पत्राद्वारे टँकरद्वारे तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. डिसेंबरपासूनच पाणी टंचाईची सुरुवात झाल्याने उन्हाळ्याच्या हंगामात समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने वेळेवर प्रभावी उपाययोजना न केल्यास, आदिवासी वस्त्यांतील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.शहापुरातील ही परिस्थिती दरवर्षीची पुनरावृत्ती ठरत असताना, धरणसमृद्ध तालुक्यातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागणे हा प्रशासनासाठी प्रश्नचिन्ह ठरत आहे.
धरणांचा तालुका, तरीही पाणीटंचाई कायम
शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा अशी राज्यातील महत्त्वाची धरणे असूनही दरवर्षी येथे पाणीटंचाई जाणवते. विशेषतः आदिवासी वस्त्यांमध्ये ही समस्या तीव्र होते.स्थानीय नागरिकांच्या मते पाणीटंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची योजना केली जाते, मात्र समस्या मात्र कायम राहून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई ‘उग्र’ रूप धारण करते.