

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ६४९ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्षात उतरले आहेत. परंतु यातील १७ ठिकाणी तुल्यबळ लढती रंगणार आहेत. या लढतीकडे पूर्ण ठाण्याचे लक्ष राहणार आहे.
काँग्रेस आणि मनसेच्या शहर अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एका पक्षाचे दोन गट झाल्याने काही ठिकाणी दोन माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एका प्रभागात बाप आणि मुलीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इतर काही माजी नगरसेवक हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
ठाणे महापालिकेची निवडणूक आता रंगतदार स्थितीकडे आली आहे. काही ठिकाणी उमेदवारांना तिकीट नाकारल्याने त्यांनी थेट आपल्याच पक्षातील उमेदवाराला अपक्ष राहून आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या लढती महत्वाच्या मानल्या जाणार आहेत.
प्रभाग क्रमांक १ मध्ये शिंदे सेनेकडे नम्रता घरत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु आपल्याला तिकीट न मिळाल्याने रवि घरत यांनी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक सिध्दार्थ ओवळेकर यांच्या समोर थेट लढत दिली आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये तीन वेळा सलग निवडून येणाऱ्या भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांची लढत मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्याशी होत आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या विक्रांत वायचळ यांना शिंदे सेनेने तिकीट देऊन बक्षीसी दिली. परंतु याठिकाणी असलेल्या माजी नगरसेवक दर्शन भोईर यांनी तिकीट कापण्यात आल्याने अपक्ष म्हणून आव्हान उभे केले आहे.
दुसरीकडे कोपरीत शिंदे सेनेच्या नम्रता पमनानी आणि मनसेच्या राजेश्री नाईक, २१ मध्ये सुनेश जोशी (भाजप) विरुध्द शिंदे सेनेचे बंडखोर किरण नाकती, काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची लढत भाजपचे वैभव कदम यांच्याशी होत आहे. प्रभाग क्रमांक २९ मध्ये बाबाजी पाटील (शिंदे सेना) विरुध्द हिरा पाटील (राष्टÑवादी - शरद पवार गट), तिकडे अनिता किणे (राष्ट्रÑवादी अजित पवार गट) विरुध्द मनिषा भगत (शरद पवार गट), मुंब्य्रात अशरफ पठाण (शरद पवार गट) विरुध्द तौहीद मोहम्मद शेख (अजित पवार गट) अशरफ पठाण यांची कन्या मरझिया पठाण हीची लढत माजी नगरसेविका अशरीन राऊत (अजित पवार गट), ३२ मध्ये इनायक बेग मिर्झा (अजित पवार गट) विरुध्द शाबीर शेख (शरद पवार गट), दिव्यात रमाकांत मढवी (शिंदे सेना) विरुध्द रोहीदास मुंडे (उध्दव सेना), मढवी यांची कन्या साक्षी मढवी हिची लढत अंकिता कदम (मनसे) यांच्याशी होत आहे. ३१ मध्ये राजण किणे (अजित पवार गट) विरुध्द महेंद्र कोमुर्लेकर (शरद पवार गट), ‘ड’मध्ये सुधीर भगत (शरद पवार गट) विरुध्द मोरेश्वर किणे (अजित पवार गट) आणि कळव्यात मिलिंद पाटील (शिंदे सेना) विरुध्द प्रकाश पाटील (शप गट), मिलिंद यांची पत्नी मनाली पाटील (शिंदे सेना) यांची लढत मागील निवडणुकीत सर्वाधिक मत्ताधिक्याने निवडून आलेल्या शिंदे सेनेच्या बंडखोर प्रमिला केणी यांच्याशी होत आहे. तिकडे खारेगावमध्ये शिंदे सेनेचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांची लढत अभिजीत पवार (शप गट) यांच्याशी होत आहे. तर राबोडीत अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्या विरोधात शरद पवार गटाने मोहम्मद असिम जावेद शेख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.