ठाणे : एका अनुदानित शाळेत महिला तक्रारदाराच्या मुलीला प्रवेश मिळवून देण्यासाठी ७७ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोघांना अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एसीबीने सोमवारी राबोडी परिसरातील संबंधित शाळेबाहेर सापळा रचून आरोपींना लाच घेताना पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक संतोष नवलगी यांनी सांगितले की, आरोपी फातिमा अन्सारी आणि चैतन्य प्रधान यांनी तक्रारदाराच्या मुलीला इयत्ता ६ वीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी एकूण १.२ लाख रुपयांची मागणी केली होती. शाळेचे अधिकृत शुल्क २२,७०० रुपये वगळता, उर्वरित ७७,३०० रुपयांची लाच स्वीकारताना या दोघांना ‘एसीबी’ने पकडले. शाळेच्या मुख्याध्यापकांवर वजन वापरून काम करून देण्याच्या बहाण्याने आरोपी ही रक्कम मागत असल्याचे तपासात उघड झाले आहे.