
ठाणे : वाहनचालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे टेम्पो चालवणारा वाहनचालक हा १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घोडबंदर मार्गावरील आनंद नगर भागात या मिनी टेम्पोने उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक दिल्यानंतर काही अंतरावरच मेट्रोसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात हा टेम्पो जाऊन पडला. रिक्षाला धडक दिल्यानंतर एका रिक्षामध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या रिक्षामध्ये असलेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी मध्यरात्री २:३५ वाजता सुमारास घोडबंदर येथील कांचनगंगा कॉम्प्लेक्स समोर, सुरज वॉटर पार्कजवळ या ठिकाणी घोडबंदर रोडवरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. महिंद्रा मिनी टेम्पोवर चालक असलेला १५ वर्षांचा अल्पवयीन चालक हा घोडबंदर रोडकडून मुंबईकडे जात होता. या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना टेम्पोचालकाने मागून धडक दिली. त्यानंतर हा टेम्पो मेट्रो मार्गासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात जाऊन पडला.
एका रिक्षामध्ये असलेल्या जितेंद्र मोहन कांबळे( ३१ ) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. वर्तकनगर परिसरात राहणारे जितेंद्र कांबळे यांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर दुसऱ्या रिक्षात असलेली व्यक्ती गणेश विश्वनाथ वाघमारे (२९) या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात करणारा अल्पवयीन वाहन चालक हा वर्तकनगर परिसरात राहणारा असून त्याला आणि त्याच्या वडिलांना कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.