Thane : वाहतूककोंडीमुळे प्रशासन हतबल; तिसरी अधिसूचना जाहीर

ठाणे जिल्ह्यात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीमुळे प्रशासन हतबल झाले असून, अवजड वाहनांच्या हालचालीबाबत एक नव्हे तर तिसरी अधिसूचना काढण्यात आली आहे. यापूर्वीचे दोन निर्णय रद्द करून नव्या आदेशानुसार आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दहा चाकी व त्यापेक्षा जड ट्रकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Thane : वाहतूककोंडीमुळे प्रशासन हतबल; तिसरी अधिसूचना जाहीर
छायाचित्र : दीपक कुरकुंडे
Published on

ठाणे: ठाणे जिल्ह्यात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीमुळे प्रशासन हतबल झाले असून, अवजड वाहनांच्या हालचालीबाबत एक नव्हे तर तिसरी अधिसूचना काढण्यात आली आहे. यापूर्वीचे दोन निर्णय रद्द करून नव्या आदेशानुसार आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दहा चाकी व त्यापेक्षा जड ट्रकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे तसेच घोडबंदर मार्गावरील कोंडी सोडवण्यासाठी पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली होती. परंतु, या निर्णयामुळे ठाणे ग्रामीण, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यात कोंडी वाढली.

दोन वर्षांच्या बालिकेचा जीव वाहतूककोंडीमुळे गमावल्याच्या घटनेनंतर संताप व्यक्त होताच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आधीचा बदल रद्द करून नवा आदेश दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यावर रात्री बारानंतरच अवजड वाहने सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेतच परवानगी दिली. या व्यवस्थेमुळे घोडबंदर मार्गावरील कोंडी कमी झाली, मात्र इतर भागात समस्या वाढल्याने तिसरी अधिसूचना काढण्यात आली.

कसारा, शहापूर, वासिंद, भिवंडी तसेच आवश्यक ठिकाणी अवजड वाहनांसाठी थांबण्याची व्यवस्था करावी. नवी मुंबई व पालघर जिल्ह्यात होल्डिंग प्लॉट्स निश्चित करावेत. महामार्ग सुरक्षा पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदी विभागांनी समन्वय साधून रस्ते सुस्थितीत ठेवावेत. ठाणे जिल्ह्यातील तीन पोलीस आयुक्तालयांसह लगतच्या विभागांनी एकत्रितपणे वाहतूक नियंत्रण उपाययोजना आखाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी

अत्यावश्यक सेवांना सूट

२० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पहाटे ५ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत अवजड वाहनांना ठाणे जिल्ह्यात प्रवेश बंदी राहील. पालघर-वाडा रोडवरील अंबाडी मार्गे भिवंडी, चिंचोटी-खारबाव, वडपा-भिवंडी नाका, कसारा, इगतपुरी बोगदा, बापगाव-गांधारी, मुरबाड चौक आणि वांगणी-कुळगाव या ठिकाणी जड वाहनांना अडविण्यात येईल. अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलिसांची वाहने आणि जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.

अन्य मार्गाचा पर्याय

नाशिककडून येणारी वाहने शहापूर येथे किन्हवलीकडे वळवून शेणवा-किन्हवली-मुरबाड-म्हसा-कर्जत चौक मार्गे जेएनपीटी व नवी मुंबईकडे जाऊ शकतील.

गणेशपुरी-भिवंडी-पडघा-वासिंद परिसरातील वाहने अबिटघर-कांबरेमार्गे पिवळी-वेल्हे-दहागावमार्गे नाशिककडे जाऊ शकतील. अवजड वाहनांना सकाळी ६ ते १० आणि दुपारी ५ ते १० पर्यंत अंमलात राहणार आहे. पश्चिम द्रुतगतीमार्ग मुंबई व काशिमीरा बाजूकडून घोडबंदर रोड, ठाणेकरीता जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द

वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणाऱ्या गंभीर वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांवर तसेच रुग्णांवरही पडत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी दौरा करण्याचे ठरवले होते, मात्र अचानकपणे हा पाहणी दौरा रद्द करण्यात आला आहे.

वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे जीवन आणि आपत्कालीन रुग्णवाहिकांचा मार्गदेखील प्रभावित होत आहे. महामार्गावरील नियोजन आणि दुरुस्ती कामांवर प्रशासनाची निष्काळजी ही मुख्य कारणे मानली जात आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रवासी या परिस्थितीबाबत नाराज असून प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

नव्या जीआरची मनसेकडून होळी

ठाणे : ठाणेकर नागरिक वाहतूककोंडीने हैराण झालेले असताना, वाहतूक शाखेकडून अवजड वाहनांच्या प्रवेशासंदर्भातील वेळेत वारंवार बदल केले जात आहेत. शनिवारी पुन्हा एकदा असा नवीन जीआर काढण्यात आला. या निर्णयाचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाण्यात जीआरची होळी करत आंदोलन केले.

मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले की, या वारंवार बदलत्या निर्णयांमुळे ठाणेकरांची गैरसोय होत असून, प्रशासनाकडून योग्य नियोजन न केल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. "वाहनचालक, विद्यार्थी, आणि नागरिक यांचा संयम संपत चालला आहे.

जीआर बदलून ठाणेकरांना गोंधळात टाकण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात," अशी मागणी मनसेने केली.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे
छायाचित्र : दीपक कुरकुंडे

पोलिसांनी आम्हाला चार दिवसांची मुदत मागितली होती, पण पुन्हा जीआर काढून ठाणेकरांची फसवणूक केली जात आहे. मोठे कॉम्प्लेक्स, संस्था आणि सर्व पक्षांनी भेद बाजूला ठेवून एकत्र यावे. प्रश्न सुटेपर्यंत मनसे रस्त्यावर उतरत राहील. उपमुख्यमंत्र्यांचा घोडबंदर दौरा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रोटोकॉलमुळे मंत्र्यांना खऱ्या ट्रॅफिकचा अनुभव येत नाही, असा टोलाही लगावला. एक दिवस उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवावी, मग ठाणेकर किती त्रस्त आहेत ते लक्षात येईल.

रवींद्र मोरे, शहर अध्यक्ष

बंदी काळात अवजड वाहने दिसल्यास फोडणार

ठाणे : ठाण्यातील वाढत्या वाहतूककोंडीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रशासन आणि राज्य सरकारवर तीव्र टीका केली. वारंवार काढले जाणारे जीआर आणि त्यांची अमलबजावणी होत नसल्यामुळे ठाणेकर मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून, मनसेने पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाला थेट जाब विचारला. बंदीच्या वेळेतही अवजड वाहने दिसली, तर ट्रक फोडले जातील, असा इशाराही मनसेने दिला. हा ठाण्यातील अवजड वाहनांवरील तिसरा जीआर आहे. यापूर्वीचे दोन जीआर रद्द झाले होते. सुरुवातीला परिवहन मंत्र्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी घातली होती. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री बैठक घेऊन तो आदेश रद्द केला.

ठाण्यातील कोंडी कमी झाली असली तरी पालघर आणि वसई-विरार परिसरात गोंधळ वाढला आणि यात एका चिमुरडीचा बळी गेला.

या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी उपस्थित केला. नवीन जीआरनुसार सकाळी ५ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ११ या वेळेत अवजड वाहनांना ठाण्यात प्रवेशबंदी असेल. यावर मनसेने आक्षेप घेत शाळा सुटण्याच्या वेळी पुन्हा कोंडी निर्माण होईल, असा इशारा दिला. जीआर काढताना विचार न करता निर्णय घेतले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in