
ठाणे : ठाणे जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उत्तम उपचार मिळावा, यासाठी क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात येत आहे. दुसरीकडे आता अशा रुग्णांचे तत्काळ निदान व्हावे, या उद्देशाने आरोग्य प्रशासनाने एआय तंत्रज्ञानाची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मागील दोन महिन्यांत याच एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ८५ रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले आहेत. यात निदान झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचारही सुरू करण्यात आले आहेत.
ठाणे पालिकेची आरोग्य यंत्रणा, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक तळागाळात जाऊन क्षयरोग निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. अशातच आता, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासकीय कामकाजात गतिमान व पारदर्शकता आणण्यासाठी एआयचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आता क्षयरोग रुग्णांचे निदान तत्काळ व्हावे, यासाठी आता एआयची मदत घेत एक्स-रे काढण्यात येत आहे. या मशीनद्वारे क्षयरोग रुग्णांचे एक्स-रे काढण्यात येत आहे. त्यानुसार मागील दोन महिन्यांत शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील ८५ रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले असून निदान झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करण्यास मदत झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे आहेत फायदे
क्षयरोगाची प्रकरणे लवकर ओळखून क्षयरोगाचा प्रसार रोखण्यात मशीन मदत करू शकते, वेळेवर उपचार सक्षम करून रुग्णाचे परिणाम सुधारण्यास मदत होते. मशीन टीबी निदान अधिक परवडणारे बनविण्यात मदत करते.
असे होते कार्य
टीबीच्या लक्षणांसाठी एआय क्ष-किरणांचे विश्लेषण करते. एआय क्षयरोगाची प्रारंभिक चिन्हे ओळखते, जरी रोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असला तरीही कार्य होते. क्ष-किरण डिजिटायझेशन करण्यासाठी मशीनला लॅपटॉप कॅमेऱ्यासोबत जोडले जाते. डिजिटाइज्ड एक्स-रे निदानासाठी डॉक्टरकडे ऑनलाइन पाठवला जाऊ शकतो.