
ठाणे : सध्याचे युग डिजिटल झाले असून, आता जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयेही डिजिटल मार्गावर येणार आहेत. ठाणे जिल्हा परिषदेने प्रशासनातील पारदर्शकता आणि कामकाजातील वेग वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ४३१ ग्रामपंचायतींना डिजिटल स्वरूप देण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीचे स्वतंत्र संकेतस्थळ (Website) तयार करण्यात येणार असून, नागरिकांना आपल्या गावाची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
या संकेतस्थळावर सरपंच, उपसरपंच व सदस्यांची माहिती, ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार, शासनाच्या विविध योजना, मालमत्ता कर, पाणीपट्टी, जमा-खर्चाचा तपशील, स्वामित्व मालमत्ता कार्ड, नमुना ८ आदी सर्व माहिती पाहता येईल.
यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता वाढून नागरिकांना सोयीस्कर आणि सुलभ सेवा मिळणार आहेत.
ग्रामपंचायतींसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर माहिती कशी अपलोड करावी, तसेच संकेतस्थळाचे संचालन कसे करावे, याचे प्रशिक्षण संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यानंतर ही संकेतस्थळे प्रत्यक्ष कार्यान्वित केली जाणार आहेत.
प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या कार्यकाळात जिल्हा प्रशासनात डिजिटल कामकाजाला गती मिळाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर फाईल, प्रस्ताव व परिपत्रक प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. त्याच धर्तीवर आता ग्रामपंचायतींच्या कामकाजातही डिजिटल प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे.