
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. इंस्टाग्रामवर व्हिडीओ टाकून शिंदे यांना धमकावण्यात आले असून धमकावणारा २६ वर्षीय तरुण हा त्यांच्याच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
रविवारी एका माथेफिरू तरुणाने इन्स्टाग्राम व्हिडीओ मार्फत एक चित्रफित प्रसारित केली. यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही चित्रफित व्हायरल होताच, ठाण्यात शिवसैनिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला.
वागळे इस्टेट भागातील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी परेश चाळके यांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाण्यात शिंदे यांना धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी हितेश प्रकाश धेंडे (२६) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.हितेश हा वागळे इस्टेट येथील वारलीपाडा परिसरात राहतो. हा परिसर एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात येतो. गुन्हा दाखल केल्यानंतर, सोमवारी सकाळी पोलिसांनी शोध घेऊन त्याला मुंबईतून अटक केली. त्याने असे कृत्य का केले, हे अद्याप समजू शकलेले नसून पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.