ठाण्यातील पडघ्यात ATS चे कोम्बिंग ऑपरेशन; १२ संशयित ताब्यात; साकिब नाचणसह अनेकांच्या घारांची झडती, 'आयसिस माॅड्यूल’मध्ये सहभागी?

दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली गावात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत बंदी घातलेल्या ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’चे (सिमी) माजी पदाधिकारी आणि सदस्यांच्या घरांसह सुमारे २४ संवेदनशील ठिकाणी झडतीसत्र राबवण्यात आले.
ठाण्यातील पडघ्यात ATS चे कोम्बिंग ऑपरेशन; १२ संशयित ताब्यात; साकिब नाचणसह अनेकांच्या घारांची झडती, 'आयसिस माॅड्यूल’मध्ये सहभागी?
Published on

मुंबई : दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली गावात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत बंदी घातलेल्या ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’चे (सिमी) माजी पदाधिकारी आणि सदस्यांच्या घरांसह सुमारे २४ संवेदनशील ठिकाणी झडतीसत्र राबवण्यात आले. त्यात काही आक्षेपार्ह साहित्य सापडले असून यावेळी बारा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलिसांना सोबत घेऊन मुंबई दहशतवादविरोधी पथकाने या छापासत्राला सुरुवात केली. या कारवाईत ४०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या छाप्याच्या वेळी ‘सिमी’ संघटनेचा माजी पदाधिकारी साकिब नाचण याच्याही घराची झडती घेण्यात आली. साकिब नाचण हा आता ‘आयसिस माॅड्यूल’चा म्होरक्या असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

मुंबईतील बॉम्बस्फोटप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या साकिब नाचण याच्यावर २००२- २००३ साली मुंबई सेंट्रल, विलेपार्ले आणि मुलुंड येथे बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप होता. त्या स्फोटांमध्ये अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेले होते. त्या प्रकरणात त्याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. २०१७ साली तो तुरुंगातून बाहेर पडल्यापासून पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. आतापर्यंत त्याला तीन वेळा अटक करण्यात आली आहे.

सोमवारच्या कारवाईत साकिब नाचणप्रमाणेच आकिब साकिब नाचन, अब्दुल लतीफ कासकर, कैफ नाचन आणि शाझिल नाचन यांच्यासह इतर अनेक संशयितांच्या घरांची आणि इतर ठिकाणांची झडती घेण्यात आली. यावेळी काही संशयित घरात नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस त्यांच्या ठावठिकाणांची माहिती घेत आहेत.

‘सिमी’चा माजी सदस्य फाराक जुबैर मुल्ला हा सौदी अरेबियाला गेल्याचे पोलिसांना आढळले, तर त्याचा मोठा भाऊ हसीब जुबैर मुल्ला हा २००२ आणि २००३ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी होता. त्यानेही दहा वर्षे शिक्षा भोगली आहे आणि ९ डिसेंबर २०२३ पासून ‘आयसिस मॉड्यूल’ प्रकरणात साकिब नाचणसह तोही सक्रिय असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Summary

आक्षेपार्ह साहित्य जप्त

या झडतीसत्रात एकूण २२ घरांमध्ये सर्च ऑपरेशन करून तेथील संशयित व्यक्तींचे मोबाइल हॅन्डसेट्स, तलवार, सुरा, मालमत्तेबाबतची संशयास्पद कागदपत्रे व दहशतवाद व चिथावणी देणारी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणालाही अटक केली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पोलीस यंत्रणेकडून पाळण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in