मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. याप्रकरणी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. या लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलण, उपोषण तसंच बंद पुकारले जात आहे. ठाणे जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून आज ठाण्यातील मराठा संघटनांच्या वतिने आज ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा संघटनांच्या वतिने आज (११ सप्टेंबर) ठाणे बंद ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
आज संभाजी ब्रिगेडच्या पाठिंब्याने ठाण्यातील सकल मराठा मोर्चा द्वार पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला सर्व विरोधी पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला. रविवारी ठाण्यातील विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने ठाणे बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ठाणेकर नागिराकांनी देखील बंदमध्ये सहभागी होऊन पाठिंबा द्यावा,असं आवाहन करण्यात आलं. या बैठकीला राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष सुहास देसाई, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रदीप शिंदे, मनेसे नेते रवींद्र मोरे, अविनाश जाधव, मराठा क्रांती मोर्चाने शहर प्रमुख रमेश आंब्रे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी उपस्थिती होती.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाण्यात सुमारे दोन हजार पोलीस तैनात करण्यात आल्याचं समजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच घर देखील ठाण्यातचं असल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ठाण्यात ४५ निरीक्षक, १६० सहाय्याक पोलीस निरिक्षक आणि उपनिरीक्षक, जवळपास १३०० कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकांच्या दोन तुकड्या, राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या तैनात असणार आहेत.