ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळणार; प्रस्तावाला केंद्राची मान्यता

देश-विदेशातून पर्यटक येण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पर्यावरण व पर्यटनवाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे
ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळणार; प्रस्तावाला केंद्राची मान्यता

ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी राज्याच्या कांदळवन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात मान्यता दिली होती आणि हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. केंद्र सरकारनेही हा प्रस्ताव मंजूर केल्याने ठाणे खाडी क्षेत्राला नवा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे या परिसरात पक्षी निरीक्षणासाठी देश-विदेशातून पर्यटक येण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पर्यावरण व पर्यटनवाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ९ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या चौथ्या बैठकीत ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी मान्यता देण्यात आली होती. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या पर्यावरणाबाबत महत्त्व असलेल्या क्षेत्रांना ‘रामसर क्षेत्र’ असे म्हटले जाते. ठाणे खाडी परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी, प्रजाती आढळतात. त्यामुळे या पाणथळ जागेला विशेष महत्त्व आहे. ठाणे खाडीच्या अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून घोषित झाले असून त्यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१मध्ये अधिसूचित झाली आहे. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे. ठाणे खाडी परिसर ‘रामसर क्षेत्र’ म्हणून घोषित झाल्याने फ्लेमिंगोसह विविध पक्षी व प्रजातींचे अधिक संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी पाणथळांसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील ‘नांदूर मधमेश्वर’ अभयारण्यास जानेवारी २०२०मध्ये रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ ठरले आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये घोषित झालेले बुलढाण्यातील ‘लोणार’ सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे. तर ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला असल्याने महाराष्ट्रातील हे तिसरे रामसर स्थळ ठरले आहे.

देशात आतापर्यंत ५० रामसर स्थळे

१९७१ साली इराणमधील रामसर शहरात ‘रामसर परिषद’ पार पडली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यावेळी ठरल्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ घोषित करण्याचे निश्चित केले. पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ, मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे इ. जागांचा समावेश करण्यात आला. भारताने ‘रामसर’ करारावर १९८२ साली स्वाक्षरी करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचचले. सध्या जगातील २४२४ पाणथळांना ‘रामसर’ स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. यात भारतातील आतापर्यंत ५० स्थळांना ‘रामसर स्थळा’चा दर्जा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in