ठाणे : आज अयोध्येत श्रीराम मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा पार पडत आहे. देशभरातील हजारो संत-महंत, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, देश-विदेशातील व्यक्ती यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे देशभरातील १५ जोडप्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मान मिळाला असून महाराष्ट्रातील २ जोडप्यांचा समावेश समावेश आहे. या जोडप्यांमध्ये दलित, आदिवासी, ओबीसीसह इतर जातींचा समावेश आहे.
गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वत्र रामनामाचा जप, रामकथा, रामचरित मानस, हनुमान चालीसा पठण, दीपोत्सव, भगवे कंदील, पताका, विद्युत रोषणाईने सर्वत्र राममय वातावरण झाल्याचे चित्र दिसत आहे.
ठाण्यात तरंगत्या रंगमंचावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, लताताई शिंदे, मीनाक्षी शिंदे यांच्यासह ठाणेकरांनी मोठी गर्दी केली होती.