ठाणे-बेलापूर पट्ट्यातील उद्योग अडचणीत; कच्च्या मालाच्या किमती वाढल्या; १०-१२ लाख कामगारांच्या रोजगारावर संकट

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता भारतातील औद्योगिक क्षेत्रावर उमटू लागले आहेत. देशातील प्रमुख औद्योगिक पट्ट्यांपैकी एक असलेल्या ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील अनेक उद्योग अडचणीत सापडले असून परिस्थिती अशीच राहिल्यास सुमारे ४० ते ५० टक्के कारखाने तात्पुरते बंद पडण्याची भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
ठाणे-बेलापूर पट्ट्यातील उद्योग अडचणीत; कच्च्या मालाच्या किमती वाढल्या; १०-१२ लाख कामगारांच्या रोजगारावर संकट
ठाणे-बेलापूर पट्ट्यातील उद्योग अडचणीत; कच्च्या मालाच्या किमती वाढल्या; १०-१२ लाख कामगारांच्या रोजगारावर संकट'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी मुंबई : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता भारतातील औद्योगिक क्षेत्रावर उमटू लागले आहेत. देशातील प्रमुख औद्योगिक पट्ट्यांपैकी एक असलेल्या ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील अनेक उद्योग अडचणीत सापडले असून परिस्थिती अशीच राहिल्यास सुमारे ४० ते ५० टक्के कारखाने तात्पुरते बंद पडण्याची भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम झाला असून आयात-निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. कच्च्या मालाच्या पुरवठ्यात विलंब होत असून त्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. परिणामी मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल राखताना उद्योगांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, युद्ध जर लवकर थांबले नाही तर येत्या काही दिवसांत अनेक कारखान्यांना उत्पादन कमी करावे किंवा तात्पुरते बंद ठेवावे लागू शकते. त्याचा थेट परिणाम १० ते १२ लाख कामगार आणि तंत्रज्ञांच्या रोजगारावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भाजीपाला आणि फळांच्या निर्यातीवर परिणाम झाला असून विशेषतः कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. हजारो टन कांदा जेएनपीटी बंदरात अडकून पडल्याने तो पुन्हा स्थानिक बाजारात आणावा लागल्याची माहिती मिळत आहे.

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यात रसायन, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी, प्लास्टिक, उत्पादन उद्योग, माहिती-तंत्रज्ञान तसेच विविध लघु-मध्यम उद्योग मिळून सुमारे चार ते साडेचार हजार उद्योग कार्यरत आहेत. यापैकी अनेक उद्योग कच्च्या मालासाठी परदेशातील पुरवठ्यावर अवलंबून आहेत. आखाती देशांतील संघर्षामुळे समुद्रीमार्गांवर अनिश्चितता निर्माण झाली असून जहाजवाहतूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचा परिणाम होत आहे.

कच्च्या मालाचा पुरवठा उशिरा होत असल्याने त्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर इंधन दर आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका लघु आणि मध्यम उद्योगांना बसत असल्याचे उद्योग क्षेत्रातून सांगितले जात आहे.

याशिवाय निर्यात प्रक्रियेलाही मोठा फटका बसत आहे. तयार मालाची निर्यात उशिरा होत असल्याने अनेक उद्योगांना उत्पादन कमी करावे लागत आहे. काही उद्योगांमध्ये कच्च्या मालाचा साठा संपत आल्याने उत्पादन पूर्णपणे थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ, वाहतूक खर्चात वाढ आणि आयात प्रक्रियेत होणारा विलंब यामुळे विशेषतः लघु व मध्यम उद्योगांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. अनेक उद्योगांकडे दीर्घकाळ उत्पादन बंद ठेवण्याइतकी आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनत आहे. सरकारने उद्योगांना तातडीने मदत करण्याची गरज आहे.

के. आर. गोपी, अध्यक्ष, स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन

logo
marathi.freepressjournal.in