"ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रो-५ च्या कामाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण"; MMRDA ने दिली माहिती

हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे मेट्रो लाईन-५ च्या उर्वरित कामांना वेग मिळणार आहे, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले. संपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण केला जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
ओपन वेब गर्डर यशस्वीरित्या बसवला
ओपन वेब गर्डर यशस्वीरित्या बसवलाX/MMRDA
Published on

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ठाणे–भिवंडी–कल्याण या मुंबई मेट्रो लाईन ५ च्या (पहिला टप्पा) अंतर्गत मध्य रेल्वेच्या वसई-दिवा मार्गावर अंजुरफाटा, भिवंडी येथे ६५ मीटर लांबीचा "ओपन वेब गर्डर (OWG)" यशस्वीरित्या बसवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे. त्यानंतर, 'मुंबई मेट्रो लाईन-५ च्या कामाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण', अशी सोशल मीडिया पोस्ट करीत एमएमआरडीएने याबाबत अधिकृत माहिती दिली.

कठीण अभियांत्रिकी कामगिरी यशस्वी

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, ४५६ मेट्रिक टन वजनाच्या गर्डरच्या लाँचिंगसाठी तीन टप्पे आखण्यात आले होते. ठाणे–भिवंडी रोड, वसई-दिवा रेल्वे मार्ग आणि २० मीटर उंचीवरील मेट्रो व्हायाडक्ट अशा तीन पातळ्यांवरील क्लिष्ट परिस्थितीत हे काम पार पाडले गेले. अचूक नियोजन, अभियांत्रिकी कौशल्य आणि यंत्रणांचा समन्वय हे यशाचे प्रमुख घटक ठरले आहेत.

प्रकल्पाला मिळणार वेग

हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे मेट्रो लाईन-५ च्या उर्वरित कामांना वेग मिळणार आहे, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले. संपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण केला जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रो दरम्यान १५ स्थानके

मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे-भिवंडी- कल्याण हा १५ स्थानके असलेला २४.९० किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. मेट्रो ५ महत्त्वाचा मार्ग असून सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग-४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग-१२ (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांच्यात परस्पर एकीकरण साधण्यात येईल. व्यावसायिक व शासकीय कर्मचारी तसेच ठाणे, भिवंडी व कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग उपयुक्त ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in