
ठाणे, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गुरुवारी अचानक मुसळधार पाऊस पडल्याने नागरिक आणि शेतकरी दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. शहरात खरेदीसाठी आलेले लोक पावसात धावत अडोसा शोधत होते, तर विक्रेत्यांचे कंदील, मातीचे दिवे आणि रांगोळी यासारख्या वस्तू भिजून नष्ट झाल्या. ग्रामीण भागात बहरलेले भात पीक जोरदार पावसामुळे आडवे झाले, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या कापणीसाठी मोठा ताण निर्माण झाला आहे.
पावसामुळे त्रस्त
ठाणे : दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असताना, ठाण्यातील नागरिक खरेदीसाठी उत्साही होते. मात्र गुरुवारी सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने हा उत्साह थांबला. पावसामुळे ग्राहक आणि विक्रेत्यांना दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. दिवाळीच्या सणासाठी बाजारपेठा सजलेल्या होत्या. ठाण्यातील जांभळीनाका, गोखले रोड, नौपाडा, गावदेवी व राम मारुती रोडसह इतर भागांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होती.
गुरुवारीही फेरीवाले आपली दुकाने मांडून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना सेवा देत होते. मात्र अचानक पावसासह विजेचा गडगडाट आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला, ज्यामुळे लोक धावत अडोसा शोधत होते. ग्राहक, विक्रेते आणि फेरीवाले सर्वजण या अचानक आलेल्या पावसामुळे त्रस्त झाले.
परतीच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
भिवंडी: भिवंडी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात गुरुवारी सायंकाळी अचानक परतीचा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. शहरी भागात काही तासांतच सखल भागात पाणी साचल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली. त्याचबरोबर दिवाळी सणाच्या तोंडावर खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हातात भाताचे पीक पूर्ण कापणीसाठी तयार असतानाच मुसळधार पावसाने नुकसान केले. बळीराज्याला करप्या आणि तुडतुडा रोगांचा प्रादुर्भाव असून, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हलक्या सरींनी सुरू झालेला पाऊस लवकरच ढगगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोर धरून मुसळधार झाला. शहरातील नागरिकांना घरी जाताना पावसात भिजावे लागले, तर फटाके विक्रेत्यांचे ऐन दिवाळी सणाच्या प्रारंभी मोठे नुकसान झाले.
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
वाडा : पालघर जिल्ह्यात बहरलेले भात पीक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणत असताना, गुरुवारी अचानक आलेल्या पावसाने त्यांची चिंता वाढवली. कापणीसाठी तयार असलेले भात पीक जोरदार वाऱ्यामुळे आडवे झाले असून, पावसात भिजल्यामुळे भाताच्या दाण्यांची व लोंब्यांची गुणवत्ता प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी मजुरी खर्च करून मजूर घेऊन कापणी सुरु केली होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे कापणीला अडथळा निर्माण झाला आहे. पावसात भिजल्यामुळे भात कापणे अवघड झाले आहे आणि भरडाई व झोडणी प्रक्रियेतही अडचणी येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जिल्ह्यातील विक्रमगड, साखरे तसेच वाडा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधूनमधून विजेचा कडकडाटही ऐकला, ज्यामुळे भीतीचा वातावरण निर्माण झाला. बहरलेले भात पीक आनंद देत असले तरी, अचानक पावसाची गडद छाया शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि असुरक्षितता आणत असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसामुळे विक्रेत्यांचे मोठे नुकसान
ठाणे: दिवाळीच्या तोंडावर ठाणे शहराला गुरुवारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांचे व फेरीवाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी शहरात पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. यामुळे रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना तातडीने आसरा शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. विक्रेत्यांचे मोठे नुकसान दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुकाने लावणाऱ्या फेरीवाल्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले. दिवाळीचे प्रतीक असलेले आकर्षक आकाश कंदील, मातीचे दिवे, रांगोळी आणि अन्य सजावटीच्या वस्तू पावसात भिजल्याने त्या विक्रीसाठी निरुपयोगी ठरल्या. त्यामुळे विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पावसामुळे खरेदीसाठी आलेले ग्राहक आणि विक्रीसाठी बसलेले विक्रेते या दोघांमध्येही तणावाचे वातावरण दिसून आले. दिवाळीच्या सणाला काहीच दिवस शिल्लक असताना, या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळॆ ऐन खरेदीचे वातावरण बिघडले असून, बाजारातील उत्साह काहीसा मंदावला आहे.