Thane : भाजप गटनेतेपदाचा निर्णय प्रलंबित; २७ जानेवारीला नाव होणार जाहीर

गटनेत्याची निवड करण्याचा अंतिम अधिकार वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी दिली.
Thane : भाजप गटनेतेपदाचा निर्णय प्रलंबित; २७ जानेवारीला नाव होणार जाहीर
Published on

ठाणे : ठाणे महापालिकेत शिंदे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपापले गटनेते निवडून गट स्थापन केले असताना, भारतीय जनता पक्षाकडून मात्र अद्याप गटनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाण्यातील भाजपच्या पक्ष कार्यालयात निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची बैठक पार पडली. गटनेत्याची निवड करण्याचा अंतिम अधिकार वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने २८ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर अडीच वर्षांसाठी महापौरपद मिळावे, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत गटनेतेपदासाठी कोण योग्य ठरू शकतो, याबाबत चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णयाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप मौन पाळण्यात आले आहे. गटनेतेपदी वरिष्ठ व अनुभवी नगरसेवकाचीच निवड केली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सत्तेत भाजपचा यथोचित सहभाग असणे आवश्यक असून, २८ नगरसेवक निवडून आल्याने जनतेला न्याय देण्याची जबाबदारी भाजपवर असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, येत्या २७ जानेवारी रोजी भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तीची नियुक्ती करण्यात येईल. तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार होऊ शकतो, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

महापौरपदासाठी भाजप सक्षम

आरक्षण कोणतेही असले तरी भाजपकडे सर्व प्रवर्गातील नगरसेवक असल्याने महापौरपदासाठी पक्ष सक्षम असल्याचा दावा लेले यांनी केला. आम्ही सत्तेत बसण्यास तयार आहोत. योग्य सन्मान मिळाला पाहिजे. उपमहापौरपदाची मागणी नाही, मात्र स्थायी समिती सभापती, परिवहन समिती, प्रभाग समिती तसेच इतर समित्यांमध्ये भाजपला योग्य वाटा मिळावा, अशी अप्रत्यक्ष इच्छा त्यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in