‘जनता दरबार’वरून भाजपमध्ये दोन गट? गणेश नाईक, संजय केळकर यांच्यात संघर्षाची चर्चा

राज्याचे वनमंत्री आणि संपर्क मंत्री गणेश नाईक हे घेत असलेला जनता दरबार आणि या जनता दरबारला समांतर असा स्थानिक आमदार संजय केळकर हे घेत असलेला जनसेवकाचा जनसंवाद यामुळे भाजपमध्येच या जनता दरबारवरून वादाची ठिणगी पडली असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
(छाया : दीपक कुरकुंडे)
(छाया : दीपक कुरकुंडे)
Published on

ठाणे : राज्याचे वनमंत्री आणि संपर्क मंत्री गणेश नाईक हे घेत असलेला जनता दरबार आणि या जनता दरबारला समांतर असा स्थानिक आमदार संजय केळकर हे घेत असलेला जनसेवकाचा जनसंवाद यामुळे भाजपमध्येच या जनता दरबारवरून वादाची ठिणगी पडली असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या चर्चेला पक्षातील निष्ठावान आणि बाहेरून भाजपमध्ये आलेले असे दोन गट पडले असून त्यांच्यातील संघर्ष वाढत असल्याची चर्चा आहे.

गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी त्यांनी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी जनता दरबार घेतला. त्याचवेळी स्थानिक आमदार संजय केळकर यांनी पक्षाच्या खोपट या कार्यालयात जनसंवादाचे आयोजन केले होते. भाजपच्या दोन्ही नेत्यांनी एकाच वेळी अशा प्रकारचे जनता दरबार आणि जनसंवाद घेतल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये हा असमन्वय आहे की पक्षांतर्गतच निष्ठावान विरोधात बाहेरून पक्षात आलेले असे दोन गट पडले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आमदार संजय केळकर यांनी घेतलेल्या जनसंवाद दरबाराबाबत गणेश नाईक यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. ठाणेकरांचे प्रश्न भरपूर आहेत, मी एकटा किती काम करणार. जर स्थानिक आमदार त्यापैकी काही प्रश्न सोडवत असतील तर बिघडले कुठे? अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली आहे.

गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला आ. निरंजन डावखरे, भाजप शहर अध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, नारायण पवार आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

कचरा प्रश्नावर भाष्य करणे टाळले

ठाण्यातील कचरा वाहतूककोंडी आणि पाणीटंचाई यावर भाष्या केले तर त्याचे राजकारण होण्याची शक्यता असल्याने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी त्या प्रश्नावर भाष्य करण्याचे टाळून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट वाद घालण्याचे टाळले आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात दुसरा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, नागरी प्रश्न सोडविण्यासाठी हा जनता दरबार असून मागील जनता दरबारात आलेल्या निवेदनांपैकी ६० टक्के निवेदनांवर कार्यवाही झाली असल्याने त्याचे समाधान आहे. पालघर, नवी मुंबई येथील जनता दरबारातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रश्न निकाली काढल्याचे वनमंत्री नाईक यांनी सांगितले. घनकचरा विभागाच्या उपायुक्तांना साफसफाईकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in