ठाण्यात निष्ठावान विरुद्ध ‘आयात’ संघर्ष पेटला; नाराज कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड

महायुतीमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी आधीच नाराज आहेत. त्यातच तिकीट वाटप करताना माजी नगरसेवकांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे ‘निष्ठावान विरुद्ध आयात’ असा संघर्ष उफाळून आला आहे.
ठाण्यात निष्ठावान विरुद्ध ‘आयात’ संघर्ष पेटला; नाराज कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड
ठाण्यात निष्ठावान विरुद्ध ‘आयात’ संघर्ष पेटला; नाराज कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड
Published on

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसफूस निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उघडपणे समोर आली. महायुतीमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी आधीच नाराज आहेत. त्यातच तिकीट वाटप करताना माजी नगरसेवकांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे ‘निष्ठावान विरुद्ध आयात’ असा संघर्ष उफाळून आला आहे.

या पार्श्वभूमीवर नाराज कार्यकर्त्यांनी मंगळवारी वर्तकनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफोड केली. आंदोलनादरम्यान कार्यालयातील काचांची मोडतोड करण्यात आली. तसेच पैसे घेऊन बाहेरच्यांना तिकीट दिले जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत प्रभाग क्रमांक १५ मधील माजी नगरसेविका वर्षा पाटील, सुवर्णा कांबळे तसेच माजी नगरसेवक राजकुमार यादव यांची नावे नसल्याने इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. काही काळ वर्तकनगर कार्यालयाबाहेर रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, इंदिरानगर आणि रूपादेवी पाडा परिसरात विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. घोडबंदर रोड परिसरातील काही इच्छुकांचे तिकीट कापण्यात आल्याने तेथील कार्यकर्त्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

मनसेचे २८ मराठी उमेदवार मैदानात

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला कडवी टक्कर देण्याच्या तयारीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मोठे पाऊल उचलले असून, २८ मराठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या सर्व उमेदवारांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने ठाण्याच्या राजकारणात ‘ठाकरे ब्रँड’ पुन्हा प्रभावी ठरणार का, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in