

ठाणे : भाजपने आमदार संजय केळकर यांच्याकडे ठाणे महापालिका निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून केळकर यांनी शिंदे सेनेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून, महायुतीत असूनही त्यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे सेनेची कोंडी केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत केळकर हे शिंदे सेनेसाठी अडचणीचे ठरू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
निवडणूक प्रमुखपद मिळाल्यानंतर भाजप-शिंदे सेना संघर्ष आणखी उग्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकीत युती झाली नाही तर केळकर शिंदे सेनेला थेट सामोरे जाण्याची तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यात मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या संघर्षापेक्षा शिंदे सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष ठळकपणे दिसून येत आहे.
नवी मुंबईत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली; ठाण्यातही देऊ शकतो. आता नाईक यांच्याकडेच भाजपने जिल्हा निवडणूक प्रभारीपद सोपविले असून संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.