ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याचे कंत्राट एल अँड टी कडे; प्रकल्प खर्च वाढून १४ हजार कोटींवर

सरकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी निविदा छाननी करून कामासाठी निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याचे कंत्राट एल अँड टी कडे; प्रकल्प खर्च वाढून १४ हजार कोटींवर

ठाणे आणि बोरीवली प्रवास दीड तासावरून अवघ्या १५ मिनिटांत करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार करण्यासाठी खोदाव्या लागणाऱ्या दुहेरी बोगद्यांचे कंत्राट अखेर बलाढ्य लार्सन अँड टुब्रो कंपनी (एल अँड टी) व मेघा इंजिनिअरिंग अॅड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) या कंपन्यांनी पटकावले आहे. एमएमआरडीएकडून यासाठी मागवण्यात आलेल्या निविदांमध्ये एल अँड टी व एमईआयएल कंपन्यांच्या निविदा सर्वात कमी रकमेच्या ठरल्यामुळे हे काम या कंपन्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी निविदा छाननी करून कामासाठी निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. उपलब्ध माहितीनुसार एमईआयएल कंपनीची निविदा सर्वात कमी दराची ठरली असून, या कंपनीला पॅकेज एकचे काम देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकाची निविदा एल अँड टी ची ठरली असून, या कंपनीला पॅकेज २ चे काम देण्यात आले आहे. पहिल्या पॅकेजमध्ये बोरीवली टोकाकडून ठाण्याच्या दिशेने ५.७५ किमी बोगदा खणण्याच्या कामाचा समावेश आहे, तर दुसऱ्या पॅकेजमध्ये ठाण्याकडून बोरीवलीच्या दिशेन ६.०.९ किमी बोगदा खणण्याच्या कामाचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४ वर्षे लागणार असून, २०२७ साली या रस्त्यावरून वाहने धावू शकतील.

एका वेळी चार ठिकाणी बोगदा खणण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. बोगद्याची एकूण लांबी २३.६८ किमी असून, २ किमी जोड मार्ग असतील. जोड मार्गाची लांबी वगळता प्रत्येक बोगद्याची लांबी ११.८४ किमी असेल. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा हा रस्ता बोरीवलीतील मागाठणे एकता नगर येथून सुरू होईल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून (२३ मीटर खोल) ठाण्यात टिकुजिनी वाडीत बाहेर पडेल. सध्या बोरीवली-ठाणे या २४ किमी प्रवासासाठी एक तासापेक्षा अधिक वेळ लागतो. हा रस्ता पूर्ण झाल्यावर मात्र हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत करता येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ५७.०२ हेक्टर वनक्षेत्राची गरज भासणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ १०६.५ चौरस किमी म्हणजेच १०६५० हेक्टर आहे. रस्त्यासाठी यापैकी केवळ ०.५ टक्के क्षेत्राची गरज लागणार आहे.

मार्ग- बोरीवलीस्थित मागेठाणेतील एकता नगर ते ठाणे मानमाडा स्थित टिकुजिनी वाडी.

बोगद्याची खोली २३ मीटर

एकूण रस्ता २३.६८ किमी

प्रत्येकी ३ पदरी रस्ता

अंदाजित खर्च ११२३५ कोटी

सुधारित खर्च १४००० कोटी रुपये

logo
marathi.freepressjournal.in