

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेला ठाणे - बोरीवली दुहेरी टनेल प्रकल्प आता जलदगतीने पुढे सरकत आहे. हा देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा ठरणार आहे. एकूण ११.८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा ठाण्याच्या घोडबंदर रोडला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरीवली प्रवासाचा कालावधी सध्याच्या ६० ते ९० मिनिटांवरून केवळ १५ मिनिटांवर येणार आहे.
हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असून, अत्याधुनिक टनल बोरिंग मशिन्सच्या साहाय्याने पर्यावरणपूरक व सुरक्षित पद्धतीने खोदकाम सुरू आहे. जमिनीच्या पृष्ठभागावर अल्प परिणाम होईल, अशी संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली आहे. प्रत्येक बोगद्यात तीन मार्गिका (लेन) असतील, त्यात एक आपत्कालीन लेन समाविष्ट असेल. तसेच दर ३०० मीटर अंतरावर आपत्कालीन मार्ग असणार आहेत. आधुनिक वायुविजन प्रणाली, अग्निशमन सुविधा, धूर शोधक यंत्रणा आणि डिजिटल एलईडी दिशादर्शक फलक यांसारख्या प्रगत सुरक्षा साधनांनी हा बोगदा सुसज्ज केला जाणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात घटेल, प्रदूषणावरही नियंत्रण येईल. तसेच नागरिकांना अधिक स्मार्ट, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील आधुनिक शहरी वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल मानले जाते.
प्रकल्पाची सद्यस्थिती
ठाणे बाजूच्या टनेल लॉन्चिंग शाफ्टचे उत्खनन ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाले असून, आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
कास्टिंग यार्ड (ठाणे) पूर्णत्वास गेले असून कार्यान्वित झाले आहे, तर बोरीवली यार्डची उभारणी सुरू आहे.
जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ठाणे येथे जवळपास पूर्ण झाली आहे, तर बोरीवलीतील स्थलांतरितांचे पुनर्वसन सुरू आहे.
नायक आणि अर्जुन नावाच्या दोन टनेल बोरिंग मशिन्स चेन्नईतील कंपनीकडून मागवण्यात आल्या आहेत.