ठाणे ते बोरिवली १५ मिनिटांत; दुहेरी बोगद्यासाठी १२ हजार ५७ कोटींचा खर्च, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

मुंबईपाठोपाठ ठाण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाणे-बोरिवलीदरम्यान दुहेरी बोगद्याचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सध्या ठाणे ते बोरिवलीदरम्यान प्रवासासाठी एक ते सव्वा तास लागतो. मात्र ११.८४ किलोमीटर लांब या दुहेरी बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त १५ मिनिटांत शक्य होणार असून वेळ व इंधनाची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार ५७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
ठाणे ते बोरिवली १५ मिनिटांत; दुहेरी बोगद्यासाठी १२ हजार ५७ कोटींचा खर्च, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा
Published on

मुंबई : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाणे-बोरिवलीदरम्यान दुहेरी बोगद्याचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सध्या ठाणे ते बोरिवलीदरम्यान प्रवासासाठी एक ते सव्वा तास लागतो. मात्र ११.८४ किलोमीटर लांब या दुहेरी बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त १५ मिनिटांत शक्य होणार असून वेळ व इंधनाची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी १२ हजार ५७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विधान भवनातील कॅबिनेट सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते.

दुहेरी बोगदा हा ११. ८४ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यामुळे बोगद्यात हवा खेळती राहिली पाहिजे. त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करावी. प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वनविभागाची दुसऱ्या टप्प्यातील परवानगी, रात्रीला काम करण्याची परवानगी घेण्यात यावी. बोरिवली बाजूकडील काम गतीने पुढे जाण्यासाठी आणि या बाजूकडील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी धडक कार्यक्रम राबवून एक महिन्यात कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. यंत्रणांनी समन्वय ठेवून प्रकल्पग्रस्तांना भाडे देऊन अथवा अन्य गृहनिर्माण प्रकल्पात पुनर्वसनासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. सबंधित अधिकाऱ्याने एक महिना कार्यवाही करीत पुनर्वसन पूर्ण करावे, बोरिवली बाजूकडील अदानी, टाटा पॉवर प्रकल्पातील आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन करावे, तसेच भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी अदानी पॉवर कंपनीला रस्त्याची अंतिम नियोजन द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सादरीकरण केले.

असा असणार दुहेरी बोगदा

ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा ११.८४ किलोमीटर लांबीचा आहे. प्रकल्प दोन पॅकेजमध्ये उभारण्यात येणार आहे. बोरिवली बाजूने ५.७५ किलोमीटर पॅकेज एक आणि ठाणे बाजूने ६.०९ किलोमीटर पॅकेज दोन असणार आहे. पॅकेज एकमध्ये ६ हजार १७८ कोटी आणि पॅकेज दोनमध्ये ५ हजार ८७९ कोटी अशा प्रकारे एकूण १२ हजार ५७ कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कार्बन उत्सर्जन १.४ लाख मॅट्रिकने टन प्रतिवर्ष कमी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in