

ठाणे : शनिवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील लोकमान्यनगर, पाडा क्रमांक २ येथे एका सदनिकेच्या छतावरील प्लास्टरचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांवर प्लास्टर पडले असून, भाडेकरू मनोज मोरे (४५) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी अर्पिता मोरे (४२) आणि मुलगा आरुष मोरे (१६) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
लोकमान्यनगर, पाडा क्रमांक २ परिसरात असलेली करुमेदेव सोसायटी ही सात मजली इमारत असून तिचे बांधकाम सुमारे १६ वर्षे जुने आहे. या सोसायटीच्या टेरेसवरील रूम क्रमांक ८०२ मधील हॉलच्या छतावरील प्लास्टरचा काही भाग शनिवारी पहाटे अचानक कोसळला.
सदनिका वर्मा यांच्या मालकीची
सदर इमारतीत एकूण ५३ सदनिका असून, त्यापैकी तीन सदनिका टेरेसवर आहेत. त्यातील रूम क्रमांक ८०२ ही सदनिका कलावती वर्मा यांच्या मालकीची आहे. या सदनिकेत मोरे कुटुंब भाड्याने राहत होते. या घटनेप्रकरणी वर्तकनगर पोलीस पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई करत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.