

ठाणे : ठाणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर ठाणे महापालिकेने हिरवा सिग्नल दिला आहे. सीसीटीव्ही बसवण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात खोदकाम करावे लागणार असल्याने ठाणे महापालिकेच्या वतीने हरकत घेण्यात आली होती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. मात्र गेल्या आठवड्यात अखेर ठाणे महापालिकेने ही परवानगी दिली असल्याने ठाणे पोलिसांचा सीसीटीव्ही बसवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
शहरांमधील गुन्हेगारीला आळा बसावा तसेच शहरे सुरक्षित राहावीत यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्हीचे जाळे बसवण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांकडून तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात येत असलेल्या इतर पालिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला परवानगी दिली असताना ठाणे पालिकेकडून मात्र हिरवा कंदील मिळालेला नव्हता. ठाणे महापालिकेच्या परवानगी अभावी ठाणे पोलिसांना हे काम सुरू करता येत नव्हते. जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांत ६ हजारांहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे ठाणे पोलिसांकडून बसवण्यात येणार आहेत. शहरातील सिग्नल परिसर, मुख्य चौक, शाळा, महाविद्यालय तसेच निर्जन ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारीला पायबंद घालणे शक्य होणार आहे.
ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. त्यामुळे त्या शहरांमध्ये कॅमेरे बसवण्यासाठी रस्ते खोदणे तसेच इतर कामांसाठी संबंधित महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. इतर महापालिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी परवानगी यापूर्वीच पोलिसांना दिली होती. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती. खोदकाम करताना रस्त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही परवानगी पालिकेकडून अडवून ठेवण्यात आली होती. मात्र आता ठाणे महापालिकेने देखील हिरवा कंदील दिला आहे.
कॅमेऱ्यांची वैशिष्ट्ये...
प्रस्तावानुसार स्थिर कॅमेरे, ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे, लांबून तसेच अंधारात वाहनांचे क्रमांक स्पष्ट दिसतील असे एएचपीआर कॅमेरे, तर वाहनांच्या वेगाची नोंद करणारे आरएलव्हीडी कॅमेरे अशा प्रकारचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार असून ते ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांना नियंत्रण कक्षात बसून संपूर्ण शहरातील गुन्हेगारीवर तसेच वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.