Thane : चेंदणी कोळीवाड्यावर राजकीय घाला! मतांसाठी गावठाण विकण्याचा डाव

ठाणे पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा जिथे पिढ्यान्‌पिढ्या समुद्राशी नाते जपणारा कोळी समाज वास्तव्यास आहे, जिथे घाम, श्रम आणि श्रद्धेवर उभा राहिलेला इतिहास आहे, त्या गावठाणावर आज थेट राजकीय डोळा पडल्याचा गंभीर आरोप स्थानिक कोळी समाजाकडून करण्यात येत आहे.
चेंदणी कोळीवाड्यावर राजकीय घाला! मतांसाठी गावठाण विकण्याचा डाव
चेंदणी कोळीवाड्यावर राजकीय घाला! मतांसाठी गावठाण विकण्याचा डावPhoto : Facebook
Published on

ठाणे : ठाणे पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा जिथे पिढ्यान्‌पिढ्या समुद्राशी नाते जपणारा कोळी समाज वास्तव्यास आहे, जिथे घाम, श्रम आणि श्रद्धेवर उभा राहिलेला इतिहास आहे, त्या गावठाणावर आज थेट राजकीय डोळा पडल्याचा गंभीर आरोप स्थानिक कोळी समाजाकडून करण्यात येत आहे.

गावठाण विस्तारित जमिनीवर उभ्या असलेल्या अनधिकृत घरांच्या जागेवर येणाऱ्या निवडणुकांचे गणित साधण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी येथे झोपडपट्टी पुनर्विकासाचा घाट घातल्याचा आरोप होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही या जागेवर पुनर्विकास होऊ शकत नाही, हे माहीत असतानाही मतांच्या लालसेपोटी नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

चेंदणी कोळीवाडा हा ठाणे शहरातील मूळ भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाचे गावठाण आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ नुसार या गावठाणाचे विस्तारित सीमांकन होणे हा कायदेशीर हक्क आहे. मात्र वर्षानुवर्षे हा हक्क डावलला जात असून, कोळी समाजाला जाणूनबुजून अतिक्रमणधारक ठरवले जात आहे.

सध्याच्या विकास आराखड्यानुसार कोळीवाड्यांवर शहरातील विकसित भागांप्रमाणेच नियम लादले जात आहेत. परिणामी कोळीवाड्यातील घरांची दुरुस्ती, पुनर्बांधणी किंवा विकास करणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियमावली लागू करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.चेंदणी कोळीवाड्याच्या पूर्व व पश्चिम भागातील काही क्षेत्र Urban Renewable Plan (क्लस्टर) अंतर्गत दाखवण्यात आले असून, यामध्ये ऐतिहासिक श्री विठ्ठल रुखुमाई मंदिराचाही समावेश आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेला हा भाग क्लस्टरमधून तात्काळ वगळण्यात यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

रेल्वे लाइनलगत १२ मीटर रुंद रस्ते प्रस्तावित करून कोळी समाजाची वंशपरंपरागत घरे बाधित केली जाणार आहेत. विकासाच्या नावाखाली मुळावर उठलेला हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विस्तारित गावठाणाच्या १५० मीटर परिसरातील गायरान जमीन ही गावकऱ्यांच्या सार्वजनिक वहिवाटीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र चेंदणी कोळीवाड्याच्या पश्चिम भागातील सिडको मैदान आणि पूर्व भागातील चेंदणी बंदराचा परिसरही आज धोक्यात आला आहे. हा संपूर्ण भाग कोळी समाजाच्या सार्वजनिक वापरासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हा लढा घरांचा नाही, अस्तित्वाचा

चेंदणी कोळीवाड्यातील मागण्या राजकीय नसून त्या मूलभूत, कायदेशीर आणि अस्तित्वाशी संबंधित आहेत. ठाणे महानगरपालिका प्रशासनाने या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास कोळी समाज रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. चेंदणी कोळीवाडा विकायला नाही, तो वाचवण्यासाठी कोळी समाज एकवटला आहे,” असा ठाम निर्धार कोळी बांधवांनी व्यक्त केला आहे.

विस्तारित गावठाण भागात पिढ्यान्‌पिढ्या वास्तव करणाऱ्या कोळी कुटुंबांची घरे सरसकट झोपडपट्टी म्हणून गृहीत धरली जात आहेत. गरजेपोटी उभारलेल्या घरांना मालमत्ता पत्रक (Property Card) देण्याऐवजी त्यांना पुनर्विकासाच्या नावाखाली विस्थापनाच्या उंबरठ्यावर आणले जात आहे. नवी मुंबईत ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात आला, तसाच न्याय चेंदणी कोळीवाड्यालाही मिळावा, अशी ठाम मागणी कोळी समाज करत आहे.

आनंद कोळी, समन्वयक चेंदणी कोळीवाडा

logo
marathi.freepressjournal.in