ठाणे शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा;पंपिंग स्टेशनला पुरवलेल्या घाण पाण्यावर होते शुद्धीकरण प्रक्रिया

पिसे धरणांतून आलेल्या पाण्यावर फिल्ट्रेशन प्रक्रिया करून ठाणे शहराला दिले जाणारे पाणी अतिशय दूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाणे शहराला होतोय दूषित पाणीपुरवठा;पंपिंग स्टेशनला पुरवलेल्या घाण पाण्यावर होते शुद्धीकरण प्रक्रिया
Published on

ठाणे : पिसे धरणांतून आलेल्या पाण्यावर फिल्ट्रेशन प्रक्रिया करून ठाणे शहराला दिले जाणारे पाणी अतिशय दूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु पिसे धरणांतून येणाऱ्या पाण्यांमध्ये आजूबाजूला असणारे वासिंद शहरातील जिंदाल कंपनीतील दूषित पाणी तसेच संपूर्ण शहराचे ड्रेनेजचे पाणी तसेच खडवली, भादाणे, आतकोली, आरंजोनोली या सर्व गावांतील जनावरांचे मलमूत्र, शेण तसेच अर्धवट जळालेले मृतदेह या सर्वांचे मिश्रण असलेले दूषित पाणी पंपिंग स्टेशनला पुरविले जात असल्याचे समोर आले आहे. त्याच पाण्यावर फिल्ट्रेशन प्रक्रिया करून सदर पाणी पिण्यासाठी ठाणे शहराला पुरविले जात असल्याचे वास्तव ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक हिरालाल भोईर यांनी समोर आणले आहे. ग्रामस्थ्यांशी चर्चा करून तसेच प्रत्यक्षात जागेवर पाहणी करून त्यांनी ही माहिती समोर आणली असल्याचा दावा भोईर यांनी केला आहे.

ठाणे महानगरपालिकेचा सन २३-२४ चा वार्षिक अर्थसंकल्प ४३७० कोटी मंजूर झालेला आहे. त्यानुसार अमृत योजना-२ पाणीपुरवठा योजना जाहीर करण्यात आली. सदर योजनेनुसार पाणीपुरवठा विस्तारी करणासाठी एकूण ३२३ कोटी ७२ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानुसार एकूण रकमेपैकी ५०० कोटी रक्कम महापालिकेतर्फे खर्च केली जाणार आहे. या अंतर्गत विविध उपक्रमाद्वारे लाखो कुटुंबांना सदर योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.

ठाणे महानगरपालिकेतर्फे वरील सर्व पाणीपुरवठा योजनेसाठी भरमसाठ पैशांची तरतूद करून ठेवलेली असताना सुद्धा प्रत्यक्षात वास्तव खूप भयानक व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याचे माजी नगरसेवक हिरालाल भोईर यांनी समोर आणले आहे.

ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य धरणांपैकी भातसा धरण (शहापूर), पिसे धरण हे आहेत. यापैकी भातसा धरणातून नदीद्वारे खुल्या स्वरूपात पाणीपुरवठा पिसे धरणात सोडला जातो व तेथून सदरचा पाणीपुरवठा पंपिंग स्टेशन टेमघर येथे केला जातो. पिसे धरणापासून पंपिंग स्टेशनपर्यंत साधारण ३ ते ४ किलोमीटर एवढे अंतर आहे. भोईर यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात सदर ठिकाणी भेटी देऊन, गावातील गावकऱ्यांशी चर्चा केली असता, भातसा धरण ते पिसे धरणापर्यंत अंदाजे ४० किलोमीटर एवढे अंतर असून भातसा धरणातून होणारा पाणीपुरवठा हा नदीद्वारे खुल्या स्वरूपात होत असल्याने आजूबाजूच्या गावातील सांडपाणी व मलमूत्र हे सहजरित्या पाण्यामध्ये मिसळले जाते.

मुख्यमंत्री ठाणेकर असताना देखील ठाणेकर नागरिकांना मलमूत्र मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे. भातसा धरणातून पाइपलाइनद्वारे थेट पंपिंग स्टेशनपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य असतानाही तसेच मुख्यमंत्री स्वतः ठाण्याचे प्रतिनिधीत्व करत असतानाही दूषित पाणीपुरवठा ठाणे शहराला होत असल्याबद्दल भोईर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भातसा धरणातून थेट पंपिंग स्टेशनपर्यंत म्हणजे सुमारे ४० ते ४५ किलोमीटर पाइपलाइन टाकून बंदीस्त स्वरूपात शुद्ध पाणी पंपिंग स्टेशनपर्यंत पुरवठा करणे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शक्य असतानाही ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी सदर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत राहणाऱ्या लाखो कुटुंबीयांमध्ये गर्भवती स्त्रिया, लहान मुले, वृद्ध व्यक्ती या सर्वांना सदरच्या पाण्यामुळे आरोग्यास गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

- हिरालाल भोईर, माजी नगरसेवक

logo
marathi.freepressjournal.in