

ठाणे : घोडबंदर, कल्याण, मुंब्रा आणि दिवा या ठाणे शहरातील विविध भागांत पाणीटंचाईच्या तक्रारी वाढत असताना, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे शहराला पुढील दोन वर्षांत २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळणार असल्याची माहिती दिली आहे. शुक्रवारी ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना आयुक्तांनी ठाणेकरांची पाणीटंचाईतून लवकरच मुक्तता होणार असल्याचे म्हटले आहे.
ठाण्याला आजच्या घडीला ५८५ दशलक्ष लिटर पाणी रोज उपलब्ध होत असून त्यात १०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची भर पडणार आहे. त्यामुळे पाण्याचा कोटा देखील वाढणार आहे.
ठाणे शहरात सद्यस्थिती मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी भविष्याचा विचार करून २०५५ पर्यंतचा पाणी आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्याचबरोबर पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये आणखी १०० दशलक्ष लिटर उपलब्ध करून दिले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सध्या ठाणे शहराला दररोज ५८५ दशलक्ष लिटर पाणी मिळते. परंतु आगामी २०५५ पर्यंत वाढत्या पाणीपुरवठ्याच्या गरजा भागवण्यासाठी सूर्या, काळू आणि शाई धरणांमधून पाणी उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे.