Thane : पालिकेचा गड राखण्याचे एकनाथ शिंदेंसमोर आव्हान

आवाज मराठीचा या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना टाळी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आल्या असताना ठाकरे बंधूंनी एकत्र येणे, यामुळे स्थानिक राजकारणाची गणिते बदलणार असून मुंबई महापालिकेप्रमाणे ठाण्यात काय होणार? याची चर्चा रंगू लागली आहे.

Thane : पालिकेचा गड राखण्याचे एकनाथ शिंदेंसमोर आव्हान
Published on

ठाणे दर्पण

अतुल जाधव

आवाज मराठीचा या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना टाळी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आल्या असताना ठाकरे बंधूंनी एकत्र येणे, यामुळे स्थानिक राजकारणाची गणिते बदलणार असून मुंबई महापालिकेप्रमाणे ठाण्यात काय होणार? याची चर्चा रंगू लागली आहे. ठाणे महापालिकेत काय होणार यापेक्षा ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाल्याने जिल्ह्याचे राजकारण कोणते वळण घेणार? याच मुद्द्याची चर्चा रंगल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठाणे हा शिवसेनेचा अभेद्य गड मानला जातो आणि आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाण्याचा गड राखण्यात एकनाथ शिंदे यांना यश मिळाले आहे. मागील एक दोन वर्षात ठाणे शहर राज्यातल्या राजकारणाचे प्रमुख केंद्रबिंदू ठरले, त्याला कारण फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कामाचा झपाटा.

आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होण्याची चिन्हे आहेत. ठाकरे बंधु एकत्र येण्याचा फारसा फटका ठाण्यात भाजपला बसणार नसला तरी शिंदे सेनेला त्याचा फटका बसणार असल्याची चर्चा आहे. ठाण्यात महायुतीत सुप्त संघर्ष सुरू आहे. शिंदे यांना कोंडीत पकडण्याची एक देखील संधी भाजप सोडत नाही, हे आजचे चित्र आहे. मागील काही दिवसात भाजपने सर्वाधिक आंदोलने आणि निदर्शने करून शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. आमदार संजय केळकर यांनी काहीं दिवसांपासून ठाणे महापालिकेला आपले लक्ष्य केले असून महापालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत रान उठवत आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे.

शिवसेनेने सत्तेची चव प्रथम ठाण्यात चाखली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बारीक लक्ष असलेले ठाणे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आकडेमोडवरून जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे घट्ट रोवली जात असल्याचे दिसून येत आहे. भाजपला मिळालेल्या मताच्या आकडेवारीवरून भाजपचा मतदार वाढत असल्याचे दिसून येत आहे.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु विभागणीनंतर त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नगरसेवक उद्धव सेनेत एकनिष्ठ राहिले. मात्र दुसरीकडे शिंदे सेनेने फोडोफोडीचे राजकारण करीत नगरसेवकांची संख्या ७४ पर्यंत नेली आहे. त्यामुळे महापालिकेवर पुन्हा एकतर्फी सत्ता संपादित करण्याची तयारी शिंदे सेनेने पूर्ण केली आहे. तिकडे भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महायुतीत धुसफूस वाढली आहे. ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आल्याने २० वर्षे ज्या क्षणाची मराठी बांधव वाट पाहत होते, त्यांना देखील आनंद झाला आहे. शिंदे यांच्या राजकीय उठावामुळे नाराज झालेले ठाण्यातील जुन्या शिवसैनिकांना राज आणि उद्धव एकत्र आल्याने नवे बळ मिळाल्याची भावना झाली आहे. निश्चितच याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर देखील होणार आहे.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे भाजप, कोपरी, पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिंदे सेनेचा वरचष्मा दिसून आला. परंतु या दोनही मतदारसंघात उद्धव सेनेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमाकांची मते मिळाली होती. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. परंतु महायुती असल्याने शिंदे सेनेला भाजपच्या मतांचा फायदा झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच आता देखील महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेला युतीची अपेक्षा आहे.

आता मराठीच्या मुद्द्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदे सेनेच्या मतांवर याचा अधिक परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. ठाकरे बंधूंचे मनोमिलन व्हावे, यासाठी उद्धव सेनेचे आणि मनसेचे स्थानिक पदाधिकारी उत्सुक होते.

एकनिष्ठ मतदार हीच भाजपची ताकद

मुंबई वगळून इतर ठिकाणी युती न करण्यापर्यंत भाजपची मजल पोहचली आहे. आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदे गटाला युतीवर भिस्त ठेवून भाजपशी जमवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे युती व्हावी हाच आग्रह शिंदे सेनेचा असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. युती झाली नाही तर निश्चितच शिंदे सेनेला निवडणूक जड जाणार आहे. राज्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढत असून ही भाजपची जमेची बाजू आहे. विधानसभा निवडणुकीच्या यशाने भाजप कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे. ठाणे शहरातील भाजपचा मतदार हा एकनिष्ठ मतदार असल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे.

मनसेबाबत ठाणेकरांना सॉफ्ट कॉर्नर

शिवसेनेच्या स्थानिक शाखा या शिवसेनेची ताकद समजली जाते. त्या शिवसेनेच्या रक्तवाहिन्या समजल्या जातात. परंतु ठाण्यातील एकदोन वगळता सर्वच शिवसेना शाखा एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या ताब्यात आहेत. उद्धव ठाकरे गटाची मोठी अडचण म्हणजे त्यांच्याकडे रस्त्यावर येऊन लढाई लढणारा शिवसैनिक राहिलेला नाही. माजी खासदार राजन विचारे सोडले तर एकही आक्रमक चेहरा त्यांच्याकडे नाही. परंतु अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेने ठाण्यात आपला दरारा कायम ठेवला आहे. मनसेला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी अन्याय झाल्यानंतर ठाणेकरांसाठी आवाज उठवणारा पहिला आवाज मनसेचा असतो. ठाणे शहरातील आंदोलनाचा इतिहास मनसेने कायम ठेवला असल्याने मनसेबाबत ठाणेकरांना सॉफ्ट कॉर्नर आहे.

अनाथांचा नाथ ही प्रतिमा तारणार...

एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठाकरे बंधूंचे एकत्र येणे आणि भाजप असे तिहेरी आव्हान असले तरी एकनाथ शिंदे यांना ठाण्यात आव्हान उभे करणे सोपे असणार नाही. चोवीस तास काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यात सुरू केलेली विकासकामे त्यासाठी मोठ्या प्रमाणात आणलेला निधी, याशिवाय ठाण्यातल्या तळागळातल्या कार्यकर्त्याकडे असलेले लक्ष. कार्यकर्ता नाराज होणार यासाठी घेतलेली काळजी. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचे प्रयत्न. सामान्य नागरिकांचे प्रश्न ठाण्यातच सोडवण्यासाठी पक्षपातळीवर निर्माण केलेली यंत्रणा ही एकनाथ शिंदे यांची ताकद आहे. मागील काहीं महिन्यात शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाले असून त्यामुळे देखील एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in