पालिका शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न; शिक्षण विभागाचे पुढचे पाऊल

अखेर सीबीएससी शाळेचा उपक्रम ठाणे महापालिका शाळांमध्ये सुरू करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून त्यामुळे महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील महागडे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पालिका शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न; शिक्षण विभागाचे पुढचे पाऊल
Published on

ठाणे : अखेर सीबीएससी शाळेचा उपक्रम ठाणे महापालिका शाळांमध्ये सुरू करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून त्यामुळे महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील महागडे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यापुढे जाऊन आता मागील कित्येक वर्षे कागदावर असलेला सीबीएससी शाळेचा उपक्रम महापालिका शाळांमध्ये लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्यात आता कळवा आणि खारेगाव भागात हा उपक्रम सुरू करता येऊ शकतो का? याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या प्राथमिक १०३ आणि माध्यमिक २३ अशा एकूण १२६ शाळा आहेत. या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालये व्यवस्था, शाळांची दुरुस्ती अशा पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यावर पालिकेने लक्ष केंद्रित केले होते. या शाळांमध्ये सुमारे ३५ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणाबरोबर नवीनवीन संधीचा फायदा कसा करून देता येईल यासाठी शिक्षण विभागाने ६२ शाळा आर्दश शाळा (मॉडेल स्कूल) करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. त्यासाठी शासनाने यापूर्वी ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधीही पालिकेला प्राप्त झालेला असून त्याअंतर्गत आदर्श शाळांचे काम सुरू आहे.

शाळा सुरू करण्यासाठी सीबीएससीचे काही नियम आहेत, त्यांचा अभ्यास शिक्षण विभागाकडून केला जात आहे. त्यासाठी लागणारी जागा, सोयीसुविधा, मैदान आदींसह इमारत कशी असावी त्याचा देखील अभ्यास या माध्यमातून करण्यात आला आहे.

त्यानंतर आता या सर्व्हेत पहिल्या टप्प्यात कळवा आणि खारेगाव येथील शाळा या सीबीएससीसाठी सुरु करता येऊ शकतात, या निर्णयापर्यंत शिक्षण विभाग आला आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून त्या शाळा सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यात आता शिक्षण विभागाला किती यश येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसे झाल्यास गोरगरीब मुलांना देखील महागडे शिक्षण आता त्यांच्या आवाक्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in