ठाणे सिव्हिल रुग्णालय होणार ‘वर्ल्ड क्लास’; सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या हालचाली

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेचे केंद्र म्हणून विकास करण्यात येत असून, नव्याने उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
ठाणे सिव्हिल रुग्णालय होणार ‘वर्ल्ड क्लास’; सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या हालचाली
ठाणे सिव्हिल रुग्णालय होणार ‘वर्ल्ड क्लास’; सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या हालचाली(Photo-X)
Published on

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेचे केंद्र म्हणून विकास करण्यात येत असून, नव्याने उभारण्यात आलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. हे रुग्णालय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी आदर्श ‘मॉडेल’ ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

कोकण विभागाच्या आरोग्य आढावा बैठकीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त तथा अभियान संचालक संजय काटकर यांनी या अद्ययावत रुग्णालयाच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परघे यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान आयुक्त काटकर यांनी रुग्णालयातील अद्ययावत ऑपरेशन थिएटर, सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू), सीटी स्कॅन, एमआरआय यांसह आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली. या सुविधा सर्वसामान्य रुग्णांसाठी विनाविलंब उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

रुग्णालयाची मोठी व्याप्ती आणि उपचार क्षमता लक्षात घेता, त्याला ‘राज्यस्तरीय’ दर्जा देण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. रुग्णालयातील काही तांत्रिक आणि वैद्यकीय पदांचे नामनिर्देश बदलून त्यांचा अधिक प्रभावीपणे रुग्णसेवेसाठी उपयोग कसा करता येईल, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यावरही भर देण्यात आला.

बैठकीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा (RBSK) आढावाही घेण्यात आला. या पंधरवड्यात बालकांची शंभर टक्के तपासणी करून आवश्यक शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय रुग्णालयातील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, औषधसाठा तसेच आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीची नियमित देखभाल याकडेही विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे अधिकारी विनोद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.

मुंबईला जाण्याची गरज भासू नये

ठाणे आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना मोठ्या आणि गुंतागुंतीच्या उपचारांसाठी मुंबई अथवा खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागू नये, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना विनामूल्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. हे रुग्णालय महाराष्ट्रातील अव्वल शासकीय रुग्णालय ठरेल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त तथा अभियान संचालक संजय काटकर यांनी व्यक्त केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in