ठाणे : मुख्यमंत्र्यांनी मारला झाडू, पाणी फवारून फूटपाथही केले स्वच्छ; 'सर्वंकष स्वच्छता मोहिमे'ला सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची (Deep Clean Drive) सुरूवात आज वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातून झाली.
ठाणे : मुख्यमंत्र्यांनी मारला झाडू, पाणी फवारून फूटपाथही केले स्वच्छ; 'सर्वंकष स्वच्छता मोहिमे'ला सुरूवात

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची (Deep Clean Drive) सुरूवात आज वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातून झाली. या मोहिमेत मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी तीन हात नाक्यावरुन मॉडेल नाका मार्गे वागळे मुख्य रस्ता, १६ नं. येथील बीएमसी पाईपलाईनवरील पूल, रोड नं. २१, रोड नं २२ येथील शिवसेना शाखा येथून चालत सर्व ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वत:ही काही ठिकाणी रस्त्यांची सफाई केली तसेच फूटपाथवर पाण्याची फवारणी करुन फूटपाथ स्वच्छ केले. सर्वंकष स्वच्छता मोहीम (Deep Clean Drive) ही लोकचळवळ व्हावी, हे अभियान मुंबई, मुंबई महानगर, एमएमआरडी क्षेत्र असे टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर राबविण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

ठाण्यातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होवू नये, यासाठी वाहतुकीचे ‍नियोजन करावे, त्याचप्रमाणे फेरीवाल्यांना हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्वच्छता अभियानाचे ठाणे महानगरपालिकेने केलेले नियोजन हे उत्कृष्ट आहे. ठाण्यातील प्रदूषण तुलनेने कमी असून ते आणखी कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरीत पट्टे तयार करावेत जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील. तसेच मियावाकी पध्दतीने वृक्षलागवड करुन शहरात जंगले (Urban forest) तयार करावीत. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जिथे स्वच्छता असेल तेथे लोक कचरा टाकत नाही. आज बीएमसी पाईपलाईन येथे साठलेला कचरा साफ केला जातो आहे, त्याठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in