ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण

घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीवर उतारा ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी ठाणे कोस्टल रोड-१ प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, अवघ्या १४ महिन्यांत प्रकल्पाने ४० टक्के काम पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग;  १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण
ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्णसंग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीवर उतारा ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी ठाणे कोस्टल रोड-१ प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, अवघ्या १४ महिन्यांत प्रकल्पाने ४० टक्के काम पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. खारेगाव टोलनाका ते गायमुखदरम्यान उभारण्यात येणाऱ्या १३.४५ किलोमीटर लांबीच्या सहापदरी, प्रवेश नियंत्रित मार्गामुळे ठाणे शहरातील वाहतुकीला मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे.

२ सप्टेंबरपर्यंतच्या प्रगतीनुसार, प्रकल्पातील एकूण ४२६ पैकी ३३२ वर्किंग पाइल्सचे काम पूर्ण झाले असून, त्याचे प्रमाण ७७ टक्के आहे. तसेच ४२६ पैकी २७७ पिअर्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय ४६० पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण १,६३२ आय-गर्डरपैकी ५०१ गर्डर उभारण्यात आले असून, १३ डेक स्लॅब स्पॅनचे कामही पूर्ण झाले आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी करण्याबरोबरच वधावन बंदर, जेएनपीटी, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दिशेने होणाऱ्या मालवाहतुकीला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ठाणे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होऊन मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण व्यवस्थेलाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे.

मॅन्ग्रोव्हचे संरक्षण; उन्नत मार्गावर भर

कोस्टल रोडचा मोठा भाग मॅन्ग्रोव्ह क्षेत्रातून जाणार असल्याने पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी व्हायाडक्ट आणि पुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, भारतात प्रथमच ग्रीनफिल्ड रोड प्रकल्पात जमिनीवर मोनोपाइल फाऊंडेशनसह सिंगल-पाइल, सिंगल-पिअर प्रणालीचा वापर केला जात असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. या प्रकल्पात २४० मीटर लांबीचा खाडी पूल, तसेच मॅन्ग्रोव्ह क्षेत्रातून जाणारा तब्बल ८.११ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग असणार आहे. या मार्गासाठी ४० ते ४५ मीटर रुंदीचा डीपी रोड राखीव ठेवण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील स्थानिक आणि आंतरशहरी वाहतूक वेगळी करण्यास मदत होणार आहे.

घोडबंदरची वाहतूककोंडी फुटणार?

ठाणे कोस्टल रोड-१ हा केवळ स्थानिक वाहतुकीसाठीचा मार्ग नसून, रणनीतिक मालवाहतूक कॉरिडॉर म्हणूनही विकसित केला जात आहे.

मुंबई-नाशिक महामार्गापासून गायमुखपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार असल्याने ठाणे, नाशिक, भिवंडी, गुजरात तसेच उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. गायमुख येथे प्रस्तावित गायमुख-फाऊंटन हॉटेल बोगद्याशी हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे ठाणे-भाईंदर प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. भविष्यात ठाणे रिंग मेट्रो, ठाणे कोस्टल रोड-२, साकेत-आमणे उन्नत मार्ग तसेच कासारवडवली-खारभव रस्त्याशी या मार्गाचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in