ठाणे : रस्ते दुरुस्तीची कामे १५ मेपर्यंत पूर्ण करा; महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, येथील कामांची पाहणी

ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए या सर्व यंत्रणांना शुक्रवारी दिले.
ठाणे : रस्ते दुरुस्तीची कामे १५ मेपर्यंत पूर्ण करा; महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, येथील कामांची पाहणी
एक्स @TMCaTweetAway
Published on

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए या सर्व यंत्रणांना शुक्रवारी दिले.

पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी शुक्रवारी केली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, मेट्रोचे अधिक्षक अभियंता अभिजीत दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला. त्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी केली. वाहतूककोंडीची सगळी ठिकाणे लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांशी चर्चा या पाहणी दौऱ्यात झाली. रस्ते दुरुस्ती, काँक्रीटीकरण, गटारांची स्वच्छता, दोन उड्डाणपुलांची कामे ही सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणा देण्यात आले आहेत, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटल लगतच्या सेवा रस्त्यावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कामाची पाहणी करण्यात आली.

त्याचबरोबर, कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम, सिनेवंडर मॉल या भागात सुरू असलेल्या पेट्रोल पंप ते नळपाडा जंक्शनपर्यंत मेट्रो तसेच जलवाहिनीच्या कामाची पाहणी करण्यात आली. या भागात रस्त्याची दुरुस्ती तसेच, नाल्यावरील उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असून त्याबाबत तातडीने नियोजन करण्यास सांगितले. घोडबंदर रोड सेवा रस्ता, उड्डाणपूलच्या शेजारील सेवा रस्ते, गटारे यांची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर, पातलीपाडा उड्डाणपुल जंक्शन, बटाटा कंपनी, आनंदनगर जंक्शन, कासारवडवली उड्डाणपुलाखाली रस्ता, भाईंदरपाडा उड्डाणपूल, त्या खालील रस्ता, नागला बंदर जंक्शन, गायमुख घाट परिसर यांचीही पाहणी केली.

उड्डाणपूल डेडलाइन

भाईंदरपाडा येथील उड्डाणपूल १५ एप्रिलपर्यंत आणि कासारवडवली येथील उड्डाणपूल १५ मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मेट्रो मार्गाखालील रस्त्यावर असलेला उंच सखलपणा पावसापूर्वी दुरुस्त करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी, कासारवडवली येथील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेले महावितरणचे काम त्यांनी जलद स्थलांतरित करण्यास सांगण्यात आले.

गायमुख घाट दुरुस्ती

गायमुख घाट येथे ८०० मीटर रस्त्याची गतवर्षीप्रमाणेच दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी, आयआयटीमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

माजिवडा ते कॅडबरी जंक्शन सेवा रस्ता

माजीवडा ते कॅडबरी जंक्शन सेवा रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. ज्या भागात जलवाहिनी टाकून झाली आहे, तिथे तातडीने रस्ता वाहतुकीसाठी योग्य करावा तसेच हे काम जलद पूर्ण करून पूर्ण सेवा रस्ता वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in