राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, सपकाळांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; ठाण्यात काँग्रेसची राज्यस्तरीय संविधान बचाव रॅली

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गृह विभागाचे अस्तित्वच संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा,  सपकाळांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; ठाण्यात काँग्रेसची राज्यस्तरीय संविधान बचाव रॅली
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, सपकाळांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; ठाण्यात काँग्रेसची राज्यस्तरीय संविधान बचाव रॅली(Photo-X/@INCHarshsapkal)
Published on: 

ठाणे : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गृह विभागाचे अस्तित्वच संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज असताना सध्याचे गृहमंत्री अकार्यक्षम ठरत आहेत. गृह विभागात हप्तेवसुली आणि भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

गृह विभागाचे प्रमुख घाशीराम कोतवालासारखे वागत असल्याची टीका करत नैतिकता असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान सपकाळ यांनी दिले. ठाण्यात आयोजित राज्यस्तरीय संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात जोरदार राजकीय भूमिका मांडली.

संविधान दिनानिमित्त गुरुवारी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहापासून रॅलीला सुरुवात झाली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नसीम खान, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राज्यात गुंड प्रवृत्तींना राजकीय संरक्षण मिळत असून गुन्हेगारीचे स्वरूप अधिक क्रूर आणि विकृत होत असल्याची टीका सपकाळ यांनी केली. गृह विभागाचे कामकाज हप्तेवसुली आणि भ्रष्टाचाराभोवती फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाटण येथील प्रकल्पाचे काम थांबविण्याच्या सूचना देऊनही ते सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करत या प्रकाराची संपूर्ण जबाबदारी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची असल्याचे ते म्हणाले. भाजपने रॅली काढण्यापेक्षा संविधानातील नैतिक मूल्यांचे पालन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

माजी मंत्री नसीम खान यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकार संविधानाची खिल्ली उडवत असल्याचा आरोप केला. महागाई, बेरोजगारी आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था यामुळे देशातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. खासदार आणि आमदारांची फोडाफोड सुरू असून इंडिया आघाडी संविधानविरोधी कायदे होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी देशात हिंदू राष्ट्र निर्माण करून मनुवाद लागू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तर खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका केली.

सत्तेपेक्षा संविधानाचे रक्षण महत्त्वाचे असून भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाण्यापेक्षा तुरुंगात जाणे पसंत असल्याचे त्या म्हणाल्या. बाळासाहेब थोरात यांनी संविधान पायदळी तुडविले जात असल्याची टीका करत गावोगावी संविधानाबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली.

संविधान वाचविणे ही काळाची गरज : डॉ. सिरिवेल्ला प्रसाद

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी भारतीय संविधानाने देशातील सर्व जाती-धर्मांतील नागरिकांना, महिलांना तसेच वंचित समाजघटकांना समान अधिकार आणि हक्क दिले असल्याचे सांगितले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे मोदी-शाह सरकार सर्वसामान्य जनतेचे हे मूलभूत अधिकारच हिरावून घेण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारतीय संविधान आज धोक्यात आले आहे. संविधानाने दिलेले अधिकार, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समतेचे रक्षण करणे ही आजची गरज आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान वाचविण्याचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केला.

संविधान मेंदूत हवे!

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संविधान हे केवळ पुस्तक म्हणून मिरवण्याची गोष्ट नसल्याचे सांगितले. संसदेत प्रवेश करताना संविधानाला डोके टेकवून उपयोग नाही, तर संविधानातील विचार मेंदूत असणे आवश्यक आहे, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. संविधानाने दिलेल्या हक्कांच्या संरक्षणासाठी यापुढे अधिक मोठा संघर्ष करावा लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकारला खाली खेचा

काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी ठाण्यात तीन वर्षांपूर्वी लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप केला. लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरावे. एक वाघ होऊन चालणार नाही, तर लाखो वाघ बनून सरकारला खाली खेचण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)